

पुणे: नवले पुलाजवळ गुरुवारी सायंकाळी पावणेसहा वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातास जबाबदार असलेल्या ट्रेलरचालकासह तिघांविरुद्ध सिंहगड रोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अपघातात ट्रेलरचालकासह क्लिनरचाही होरपळून जागीच मृत्यू झाला आहे.
ट्रेलरचालक रुस्तम रूदार खान (वय 35, रा. किरवारी, किसनगड, जि. खेरतल, राजस्थान), मदतनीस (क्लिनर) मुस्ताक हनीफ खान (वय 31, रा. मनापुरी, रासगड, जि. अलवर, राजस्थान) आणि ट्रेलर मालक ताहीर नासीर खान (वय 45, रा. किसनगड, राजस्थान) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिस उपनिरीक्षक मधुकर तुपसौंदर यांनी सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तिघांविरुद्ध भारतीय न्यायसंहिता कलम 105, 281, 125 (अ), (ब), 324 (4), मोटार वाहन कायदा कलम 184, 119, 177 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ताहीर खान ट्रेलरचा मालक आहे. हा ट्रेलर राजस्थान येथील खेरतल जिल्ह्यातील आहे. चालक रुस्तुम आणि क्लिनर मुस्ताक हे दोघे ट्रेलरमध्ये अवजड लोखंडी माल घेऊन साताऱ्याकडून मुंबईच्या दिशेने मुंबई-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाने निघाले होते. ट्रेलर नवले पुलाजवळ आल्यानंतर सेल्फी पॉइंट येथे त्याने एका वाहनाला धडक दिली. ट्रेलरने जवळपास 16 ते 17 वाहनांना उडविले. नंतर तो एका प्रवासी कारला धडकला. त्याने कारला फरपटत नेत तो समोरील दुसऱ्या कंटेनरवर आदळला. त्यामध्ये कारला आग लागली. क्षणात कारने धडक देणाऱ्या ट्रेलरला देखील आगीच्या कवेत घेतले. या अग्नितांडवात 7 जणांचा होरपळून मृत्यू झाला. त्यामध्ये कारमधील पाच जणांचा तर ट्रेलरमधील दोघांचा समावेश होता. दरम्यान, अपघातात 13 जण जखमी झाले. तर, 8 जणांचा मृत्यू झाला. अपघातास जबाबदार असलेल्या ट्रेलरचालकाची सुरुवातीला ओळख पटलेली नव्हती. मात्र रात्री उशिरा त्याची ओळख पटली. दोघेही कंटेनरमधील माल राजस्थानमधून मुंबईला पोहचविण्यासाठी जात होते. त्यावेळी हा अपघात झाला असल्याचे समोर आले आहे.
ट्रेलरचा वेग जास्त असण्याची शक्यता?
ट्रेलरचा वेग जास्त असण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. कारण त्याने समोरील 16 ते 17 वाहनांना धडक दिली आहे. त्यानंतरही तो एका कारला धडकला. कारला फरपटत तो एका दुसऱ्या कंटेनरवर आदळला. त्यानंतरही काही अंतर त्याने कार व समोरच्या कंटेनरला फरपटत नेले. त्यामुळे धडक देणाऱ्या ट्रेलरचा वेग जास्त असावा असा अंदाज आहे. त्यात बेक फेल झाल्याने चालकाचा निरूपाय झाला असल्याचा अंदाज आहे.
अपघाताची सर्व बाजूंनी चौकशी!
हा अपघात नेमका कसा झाला, यादृष्टीने तपास सुरू आहे. ट्रकचालकाने मद्यप्राशन केले होते का? या दृष्टीने तपास करण्यात येत आहे. भरधाव वेगामुळे नियंत्रण सुटल्याने ट्रकने एकापाठोपाठ वाहनांना धडक दिली का, खरंच त्याचा बेक फेल झाला होता. पोलिसांनी या परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासण्यास सुरुवात केली आहे.
‘आरटीओ’कडून पाहणी
पुणे प्रादेशिक परिवहन विभागाने अपघाताच्या घटनास्थळी भेट देऊन अपघातग््रास्त कंटेनरची पाहणी केली. ‘आरटीओ’ने ट्रेलरची पाहणी केली असून, नेमका अपघात का व कशामुळे झाला, याचा अहवाल सादर करणार आहेत.