

पौड रोड: पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरक्षण सोडत होताच पौड रोड, कोथरूडसहित बावधन परिसरातील वस्ती भाग असो किंवा सोसायटीचा भाग असो, सर्वत्र परिसरात राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. निवडणुकीच्या आरक्षण सोडत संपताच आपली जागा निश्चित करत पोस्टरबाजी, फ्लेक्सबाजी आणि सोशल मीडियावरील प्रचार मोहिमा जोमात सुरू झाल्या आहेत.
भाजप, राष्ट्रवादी काँग््रेासचे दोन्ही गट (अजित पवार व शरद पवार), शिवसेनेचे दोन्ही गट (शिंदे व ठाकरे), काँग््रेास, मनसे, आम आदमी पार्टी, वंचित बहुजन आघाडी आणि आरपीआय या प्रमुख पक्षांकडून अद्याप उमेदवार निश्चितीबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र, पक्ष निर्णयाची वाट न पाहता अनेक इच्छुकांनी स्वतःच ‘जनतेचा उमेदवार‘ म्हणून मैदानात उतरण्याची चढाओढ सुरू केली आहे.
आता फक्त टार्गेट पुणे महानगरपालिका, आता माघार नाही मैदान आपलेच, भावी नगरसेवक-जनसेवक, प्रभागातील उभरतं नेतृत्व, अशी घोषवाक्ये घेऊन काही इच्छुकांनी सोशल मीडियावर जोरदार प्रचार मोहीम व शक्तिप्रदर्शन, रिल्स, स्टेटस आणि ट्रोलिंग प्रचार सुरू केला आहे. फेसबुक, इन्स्टाग््रााम, यूट्यूब आणि व्हॉट्स ॲपवर रील्स, व्हिडीओ, ग््रााफिक्स आणि प्रचार पोस्ट्सचा अक्षरशः पूर आला आहे.
बंडखोरीची ठिणगी पडण्याची शक्यता
प्रभागात लावण्यात आलेल्या फ्लेक्स आणि बॅनरमुळे स्थानिक नागरिकांचे लक्ष वेधले जात असले तरी यामुळे पक्षांतर्गत असंतोषाला सुरुवात झाली आहे. अधिकृत उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच स्वतःच उमेदवार घोषित करणाऱ्यांमुळे स्थानिक नेत्यांपुढे अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. ऐनवेळी माघार घेण्यास सांगणे कठीण ठरेल, आणि त्यामुळे बंडखोरीची ठिणगी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
राजकारणात थांबा आणि पाहा, अशी स्थिती
आरक्षणे जाहीर झाल्यानंतर विविध गट-गणांमध्ये शक्तिप्रदर्शन सुरू झाले आहे. मतदारांना सहली, धार्मिक भेटी, सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सोशल मीडियावरची चमकोगिरी हे आता राजकारणातील नवीन ट्रेंड ठरत आहे. हौशे, नवशे आणि गवशे उमेदवारांची रिंगणात वाढलेली गर्दी लक्षवेधी ठरत आहे. काही इच्छुकांचा उद्देश केवळ प्रसिद्धी मिळवणे इतकाच असल्याचे दिसून येते, तर प्रत्यक्ष निवडणुकीच्या वेळी अशा अनेकांचे अर्थपूर्ण गायब होण्याचे चित्र दिसण्याची शक्यता आहे. सध्या तरी पूर्व हवेलीतील राजकारण थांबा आणि पाहा, या स्थितीत असले तरी, येत्या काही दिवसांत कोण कोणाच्या पाठीशी राहील आणि कोण बाजू बदलेल हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.