

तळेगाव ढमढेरे: पुणे-अहिल्यानगर महामार्गावरील कासारी फाटा (ता. शिरूर) येथे मंगळवारी (दि. 9) रात्री 10 वाजता एका मद्यधुंद कंटेनरचालकाने चांगलाच थरकाप उडवला. भरधाव कंटेनर चालवित त्याने दोन चारचाकी व दोन दुचाकीसह एका चहाच्या दुकानाला धडक दिली. या भीषण अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर पाचजण जखमी झाले. याशिवाय चारही वाहनांसह दुकानाचे मोठे नुकसान झाले.
चंद्रकला संदीप मुळे (वय 65, रा. ता. केज, जि. बीड) असे या अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. तर पिकअप जीपमधील तेजस विलास पंदरकर व मयूर विलास पंदरकर (दोघे रा. पिंपळगाव पिसा, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर), कारमधील जयवंत रानुजी भाकरे, विजया जयवंत भाकरे, रामदास देवराम भाकरे (सर्व रा. माळवाडी, टाकळी हाजी, ता. शिरूर) हे जखमी झाले.
याप्रकरणी पिकअप जीपचालक तेजस विलास पंदरकर (वय 25, रा. पिंपळगाव पिसा, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) याने शिक्रापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सरफराज बशीरभाई नरसलिया (वय 38, रा. भागवतीबरा, ता., जि. राजकोट, गुजरात) या कंटेनरचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कासारी फाटा येथे पुणे-अहिल्यानगर महामार्गावरून तेजस पंदरकर व मयूर पंदरकर हे दोघे मंगळवारी (दि. 9) रात्री त्यांच्या ताब्यातील पिकअप जीपमधून (एमएच 12 एसएक्स 5220) पुण्याच्या दिशेने जात होते. पाठीमागून आलेल्या कंटेनरने (जीजे 03 सीयू 3900) पंदरकरच्या जीपला जोरदार धडक दिली.
त्यामुळे जीप रस्त्यावर उलटली. कंटेनरने पुढे भरधाव जात कारला (एमएच 14 जेआर 0070) धडक दिली व रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या चंद्रकला मुळे या महिलेसह दुचाकी (एमएच 12 एक्सएफ 4535) व (एमएच 12 डब्ल्यूएफ 5057) या दोन दुचाकीला चिरडले.