

पुणे: पुणे महापालिकेच्या मिळकत कर थकबाकीदारांना दिलासा देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या अभय योजनेला पहिल्याच दिवशी अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळाला. शनिवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत तब्बल 1,127 मिळकतधारकांनी 6 कोटी 28 लाखांची थकबाकी महापालिकेकडे जमा केली.
महापालिकेने मिळकतकर थकबाकीदारांसाठी अभय योजना जाहीर केली आहे. यात थकबाकीवरील दंडाच्या रकमेवर 75 टक्के सवलत दिली जाणार आहे. ही योजना 15 नोव्हेंबर 2025 ते 15 जानेवारी 2026 अशा दोन महिने कालावधीसाठी असेल. या पूर्वी 2015-16,2016-17,2020-21 व 2021-22 या अभय योजनांचा लाभ घेतलेल्या थकबाकीदारांना यंदाच्या योजनेचा लाभ घेतला येणार नाही.
थकबाकीदारांना महापालिकेच्या वेबसाइटवरून ऑनलाइन पद्धतीनेही कर व थकबाकीची रक्कम भरता येईल. थकबाकीदारांनी अभय योजनेचा लाभ घेऊन तातडीने थकबाकीची रक्कम भरावी, असे आवाहन उपायुक्त रवी पवार यांनी केले होते. त्याला थकबाकीदारांनी चांगला प्रतिसाद देत पहिल्या दिवशी त्यांनी मोठ्या प्रमाणात थकीत कर भरून दंडात सवलत मिळवली. निवासी, बिगर निवासी व मोकळ्या जागांसह एकूण 4.81 लाख करदाते या योजनेचे लाभार्थी ठरणार आहेत.
महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट गावांची 2 हजार कोटी, मोबाइल टॉवरची 4,250 कोटी, तर जुन्या हद्दीतील मिळकतींची थकबाकी धरून एकूण 6,37,609 मिळकतींवर 13,097.11 कोटींची थकबाकी प्रलंबित आहे.
योजनेच्या उद्घाटनानिमित्त महापालिकेची मुख्य इमारत, सोळा क्षेत्रीय कार्यालये व 59 नागरी सुविधा केंद्रांवर बोर्ड, बॅनर्स, रांगोळी सजावट करण्यात आली होती.