बारामती : शिर्सूफळमधील मंदिरातील चोरीप्रकरणी तिघांना अटक | पुढारी

बारामती : शिर्सूफळमधील मंदिरातील चोरीप्रकरणी तिघांना अटक

बारामती, पुढारी वृत्तसेवा

शिर्सूफळ (ता. बारामती) येथील प्रसिद्ध श्री. शिरसाई मंदिरातील चोरी प्रकरणी बारामती तालुका पोलिसांनी गोकूळ शिरगाव ( ता. करवीर, जि. कोल्हापूर) येथून तिघांना ताब्यात घेत अटक केली. त्यांच्याकडून चोरीला गेलेल्या साहित्यासह गुन्ह्यात वापरलेली मोटार जप्त करण्यात आली.

शाहरूख राजू पठाण (वय २४, रा. गोकूळ शिरगाव, कोल्हापूर, मूळगाव शिवतक्रारवाडी-निरा, ता. पुरंदर, जि. पुणे), पूजा जयदेव मदनाळ (वय १९, रा. गोकूळ शिरगाव, कोल्हापूर, मूळ रा. जुनाबिडी कुंभारी, सोलापूर) आणि अनिता गोविंद गजाकोश (वय १९, रा. गोकूळ शिरगाव, कोल्हापूर, मूळ रा. गोलघुमट, शिवाजी चौक, विजापूर, कर्नाटक) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. यातील शाहरूख व पूजा हे पती-पत्नी असून अनिता ही शाहरूख याची मेहुणी आहे.

राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्सूफळ येथील शिरसाई मंदिरात शनिवारी (दि. ८) रात्री एक ते पहाटे तीन या दरम्यान चोरी झाली होती. देवीच्या दागिन्यांसह पितळी समया, पणत्या असा १५ लाख रुपयांचा ऐवज चोरीला गेला होता. वैभव विश्वनाथ क्षीरसागर या पुजाऱ्याने यासंबंधी फिर्याद दाखल केली होती. देवीच्या मंदिरात चोरी झाल्याने ग्रामस्थ संतप्त झाले होते. त्यांनी तात्काळ आरोपींना अटक करण्याची मागणी केली होती. घटनेचे गांभिर्य लक्षात घेत पोलिस उपअधिक्षक गणेश इंगळे, पोलिस निरीक्षक महेश ढवाण यांच्यासह गुन्हे शोध पथकाने तात्काळ शिर्सूफळला भेट दिली होती. ग्रामस्थांच्या भावना लक्षात घेत आरोपींना दोन दिवसांत गजाआड करू असा शब्द दिला होता. त्यानंतर त्यांनी आपला शब्द खरा करत आरोपींना अटक केली.

पोलिस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख, अपर अधिक्षक मिलिंद मोहिते यांनी तपास पथकाला मार्गदर्शन केले होते. चोरीच्या घटनेनंतर वेगवेगळी पोलिस पथके तपासासाठी तयार करण्यात आली. त्यांनी शिर्सूफळ, दौंड तालुक्यातील मळद, कुरकुंभ, दौंड, बारामती व आसपासच्या परिसरातील ६० ते ६५ सीसीटीव्ही कॅमेराच्या फुटेजची पाहणी केली होती. परंतु रात्रीची वेळ असल्याने त्यावरून फारसे काही हाती लागले नाही. वाहनाचा क्रमांक मात्र पोलिसांच्या हाती लागला. संशयितांनी मास्क परिधान केल्याने त्यांची ओळख लागत नव्हती.

गुन्ह्यात वापरलेल्या एमएच-१४ एफएक्स-४५७६ या मोटारीवरून पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. या वाहनाच्या मूळ मालकाचा शोध घेतला असता तो पिंपरीतील असल्याचे दिसून आले. परंतु त्याने आपले वाहन ४ डिसेंबर रोजी चोरीला गेल्याचे व त्यासंबंधी पिंपरी पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल केल्याचे सांगितल्याने पोलिसांसमोरील काम आणखी कठीण बनले.

तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपीचा माग काढण्यात आला. तो वर्धनगड परिसरात असल्याचे मोबाईल लोकेशनवरून दिसून आले. परंतु हा भाग डोंगराळ असल्याने नीटपणे लोकेशन मिळाले नाही. अखेर तो गोकूळ शिरगावला पोहोचल्याचे लक्षात येताच बारामतीतून पोलिस निरीक्षक ढवाण व त्यांचे पथक तयार झाले. अवघ्या २ तास ४० मिनिटात त्यांनी गोकूळ शिरगाव गाठत राहत्या घरातून तिघा आरोपींना ताब्यात घेतले. गुन्ह्यातील मोटारीसह अन्य साहित्य असा सुमारे १२ लाखांचा मुद्देमालही पोलिसांनी हस्तगत केला. शिर्सूफळ येथील मंदिरात चोरी करण्यापूर्वी आरोपींनी दौंडमध्ये एका मंदिरात चोरी केली. शिर्सूफळहून पुढे जाताना पुसेगावातही एका मंदिरात हात साफ केल्याचे तपासात पुढे आले.

या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या तिघा आरोपींना बारामती न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना १५ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

ही कामगिरी पोलिस निरीक्षक महेश ढवाण यांच्यासह सहाय्यक पोलिस निरीक्षक योगेश लंगुटे, हवालदार रमेश भोसले, नंदू जाधव, राहूल पांढरे, विजय वाघमोडे, विनोद लोखंडे, रणजिक मुळीक, अमोल नरुटे, मंगेश कांबळे, बापू गावडे आदींनी केली.
शाहरूख पठाण हा सराईत चोर आहे. त्याने यापूर्वी अनेक ठिकाणी चोऱ्या केल्या आहेत. त्याच्यावर यापूर्वी पुण्यातील भोसरी, समर्थ पोलिस ठाणे, फरासखाना पोलिस ठाण्यात वाहन चोरीचे गुन्हे दाखल आहेत.

अटक करण्यात आलेल्या या तिघांचा राज्यभर चोरीनिमित्त वावर असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. ज्या भागात चोऱ्या करायच्या आहेत तेथे खोली भाडोत्री घेवून ते राहत होते. चोरीच्या वाहनातून जात चोऱ्या केल्या जात होत्या. वाहनामध्ये महिलांसह पाळीव कुत्रे असल्याने कुटुंबच प्रवास करत असल्याचा भास निर्माण केला जात होता. गोकूळ शिरगावात गेल्या आठ दिवसांपूर्वीच ते राहायला गेले होते.

५० ठिकाणी केल्या चोऱ्या

आरोपी शाहरूख व त्याच्या पत्नी आणि मेहुणीने राज्यातील नागपूर, वर्धा, लातूर, बीड, उस्मानाबाद, सातारा, कोल्हापूर आदी जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी सुमारे ५० मंदिरात चोऱ्या केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. मंदिरात चोऱ्या करणे व वाहने चोरणे यात आरोपींचा हातखंडा आहे.

तालुका पोलिस ठाण्याच्या या कामगिरीचे अपर पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते यांनी कौतुक केले. ग्रामस्थांना दिलेला शब्द पोलिस पथकाने खरा करून दाखवला, या शब्दात त्यांनी पथकाचे कामाचे कौतुक केले. शिवाय पाच हजार रुपयांचे बक्षिस या पथकाला जाहीर केले.

शिर्सूफळची श्री. शिरसाई देवी ही राज्यभरातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. या मंदिर परिसरात शेकडो माकडांचा वावर असतो. राज्यभरातून लोक येथे दर्शनाला येतात. मंदिरात झालेल्या चोरीमुळे ग्रामस्थांच्या भावना तीव्र झाल्या होत्या. परंतु पोलिसांनी अवघ्या दीड दिवसात आरोपींना जेरबंद करत देवीचे दागिने व अन्य साहित्य हस्तगत केले. त्यामुळे ग्रामस्थांकडून सोमवारी (दि. १०) पोलिस पथकाचा पोलिस ठाण्यात सत्कार करण्यात आला.

हेही वाचा

Back to top button