जळगाव, पुण्यात मराठा विद्याप्रसारक संस्थेशी संबंधित गुन्ह्यात छापेमारी - पुढारी

जळगाव, पुण्यात मराठा विद्याप्रसारक संस्थेशी संबंधित गुन्ह्यात छापेमारी

पुणे : पुढारी वृत्तसेवा

जळगावमधील मराठा विद्या प्रसारक संस्थेशी संबंधित माजी मंत्री गिरीश महाजन संशयित आरोपी असलेल्या पुण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात पुणे पोलिसांच्या विशेष पथकाने छापेमारी केली. जळगाव व पुण्यात एकाचवेळी पाच प्रमुख आरोपींच्या घर व कार्यालयावर ही छापेमारी केली आहे. येथून महत्वाची कागदपत्रे हाती लागली असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती. ४० जणांच्या पथकाने ही छापेमारी केली आहे.

ॲड. विजय पाटील (वय ५२) यांनी कोथरुड पोलिस ठाण्यात जानेवारी २०२१ मध्ये फिर्याद दिली होती. त्यावरुन गिरीश दत्तात्रेय महाजन (रा. जामनेर, जळगाव), तानाजी भोईटे (रा. कोंढवा), नीलेश भोईटे, वीरेंद्र भोईटे (रा. भोईटेनगर जळगाव) यांच्यासह 29 जणांविरुद्ध भादवी कलम १२० (ब), ३३१, ३८४, ३७९, ४४७, ४४८, ४४९, ४५४, ४६५, ४६७, ४६८, ४७१, ४७४, ५०४, ५०६ (२), ५११, १०९, ३४ नुसार गुन्हा दाखल झाला होता.

तक्रारदार अॅड. विजय पाटील यांना आरोपींनी कट व संगनमत करून संस्थेची कागदपत्रे ताब्यात देतो, असे म्हणून पुण्यात बोलाविले. त्यानंतर त्यांना दमदाटी व शिवीगाळकरून संस्था ताब्यात देण्याकरिता दबाव आणला. त्यांना एक कोटी घेऊन संस्था ताब्यात देण्यास सांगितले होते. संस्था ताब्यात न दिल्यास जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी देखील दिली होती. त्यांना व साक्षीदारांना स्कोडा गाडीत डांबून पुण्यातील फ्लॅटवर जबरदस्तीने नेण्यात आले. तेथे त्यांना मारहाण करून त्यांच्या पोटाला चाकू लावला. तसेच, त्यांचे कपडे काढून त्यांना डांबून ठेवले.

संस्थेच्या सर्व संचालकांचे राजीनामे आणून न दिल्यास व संस्था ताब्यात न दिल्यास एमपीडीएच्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिली होती. खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची भीती दाखवून खंडणी स्वरूपात ५ लाख रुपये घेतले. त्यानंतर संस्थेत बेकायदेशीर प्रवेश करून कागदपत्रे नेली असल्याचा गुन्हा दाखल आहे.

हा गुन्हा प्रथम जळगाव जिल्ह्यातील भिंगोरी पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. परंतु, गुन्हा पुण्यात घडल्याने तो पुण्यातील कोथरूड पोलीस ठाण्यात वर्ग केला गेला होता. या गुन्ह्याचा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होता. त्यानंतर या गुन्ह्यात पुणे पोलिसांनी मोक्का कारवाई केली आहे. परंतु, अद्याप अटक कोणाला करण्यात आलेली नाही.

दरम्यान, या प्रकरणातील फिर्यादीमध्ये माजी मंत्री गिरीश महाजन यांच्याही नावाचा उल्लेख होता. त्यामुळे पुणे पोलिसांनी संबंधित प्रकरणामध्ये महाजन यांची नेमकी भूमिका काय आहे, याचा तपासणार करणार असल्याचे स्पष्ट केले होते. दोन दिवसांपुर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी संबंधित प्रकरणात “मोक्का’अंतर्गत कारवाईबाबतचा उल्लेख केला होता.

संबंधित प्रकरण कोथरुड पोलिस ठाण्यात दाखल असल्याने महिला सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखालील ३० जणांचे एक पथक रविवारी सकाळी जळगावमध्ये दाखल झाले होते. संबंधित पथकाने संबंधीत गुन्ह्यातील संशयित आरोपी व महाजन यांचे निकटवर्तीय असणाऱ्या पाच जणांच्या घरी झाडाझडती घेण्यास सुरुवात केली होती. रविवारी रात्री उशीरापर्यंत झाडाझडती सुरु होती, अशी माहिती सूत्रांनी दिली. महाजन यांची चौकशी झाली नसल्याचीही माहिती सूत्रांनी दिली.

Back to top button