पुरेशी झोप न घेणारी मुले खातात जास्त साखर, संशोधनातील निष्कर्ष | पुढारी

पुरेशी झोप न घेणारी मुले खातात जास्त साखर, संशोधनातील निष्कर्ष

उटाह : तंदुरुस्त आरोग्याचा थेट संबंध पुरेशा झोपेशी असतो. अमेरिकन संशोधकांनी यासंबंधी केलेल्या संशोधनाचे निष्कर्ष थोडीशी चिंता वाढवणारे आहेत. संशोधकांच्या मते, हायस्कूलमधील सुमारे 73 टक्के मुले पुरेशी झोप घेत नाहीत. त्यामुळे ही मुले साखरेचे जास्त सेवन करतात आणि त्यांच्या आरोग्यावर त्याचा प्रतिकूल परिणाम होतो. हे संशोधन ‘स्लीप जर्नल’मध्ये प्रसिद्ध करण्यात आले आहे.

यापूर्वी करण्यात आलेल्या अनेक संशोधनातील निष्कर्षानुसार जर मुलांनी पुरेशी झोप घेतली नाही तर त्याचा मानसिक आरोग्य आणि शैक्षणिक कामगिरीवर प्रतिकूल परिणाम होतो. याशिवाय त्यांच्या व्यवहारातही बदल होत जातो. मात्र, ब्रिघम यंग युनिव्हर्सिटीद्वारा सिनसिनाटी चिल्ड्रेन हॉस्पिटल मेडिकल सेंटरमध्ये करण्यात आलेल्या नव्या संशोधनानुसार पुरेशी झोप न घेतल्याने किशोरवयीन मुलांमध्ये वजन वाढणे आणि कार्डियोमेटाबॉलिक आजारांचा धोका बळावतो.

याशिवाय मुलांच्या खाण्या-पिण्याच्या सवयीत व व्यवहारातही बदल होत जातो. या संशोधनाची प्रमुख लेखक आणि सायकॉलॉजी प्रोफेसर डॉ. कारा ड्यूरासियो यांच्या मते, अपुर्‍या झोपेमुळे किशोरवयीन मुले अधिक कार्बोहायड्रेट, साखर आणि गोड पेये घेण्याचा धोका बळावतो. दरम्यान, या संशोधनात किशोरवयीन 93 मुलांच्या झोप आणि खाण्याच्या पॅटर्नचे विश्‍लेषण करण्यात आले. या संशोधनात मुलांच्या साडेसहा तासांच्या झोपेला अपुरी तर तर 9 तासांच्या झोपेला पुरेशी म्हटले आहे.

Back to top button