कोल्‍हापूर : साडेपाच लाख रुपयांची लाच स्वीकारताना राधानगरीच्या प्रांत अधिकाऱ्यासह फराळे गावच्या संरपंचांना जेरबंद | पुढारी

कोल्‍हापूर : साडेपाच लाख रुपयांची लाच स्वीकारताना राधानगरीच्या प्रांत अधिकाऱ्यासह फराळे गावच्या संरपंचांना जेरबंद

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा

स्टोन क्रेशर व्यावसायिकावर कारवाई टाळण्यासाठी साडेपाच लाख रुपयाची लाच स्वीकारणाऱ्या राधानगरी प्रांताधिकारी प्रसेनजित बबनराव प्रधान (वय 40) आणि फराळे ग्रामपंचायतीचे सरपंच संदीप जयवंत डवर (42) यांना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने आज (रविवार) दुपारी सेंट्रल बिल्डिंग मधील कार्यालयात पकडले. पोलीस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत आणि त्यांच्या पथकाने कारवाई केल्याने महसूल खात्यासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी प्रांताधिकारी प्रसेनजीत प्रधान आणि सरपंच संदीप डवर यांच्यावर शाहूपुरी पोलीस ठाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस सूत्रांकडून सांगण्यात आले की, तक्रारदार उद्योजकाचा फराळे ग्रामपंचायतीच्या हद्दीत स्टोन क्रेशरचा व्यवसाय आहे. स्टोन क्रेशरवरील अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे परिसरातील सर्व रस्ते खराब झाले आहेत. शिवाय धुळीमुळे प्रदूषण तसेच काही घरांच्या भिंतीना तडे गेले आहेत. या पार्श्वभूमीवर सरपंच संदीप डवर यांनी ग्रामपंचायतीच्या वतीने तक्रारदार व्यावसायिकास क्रेशर का बंद करण्यात येऊ नये याची कारणे दाखवा नोटीस बजावली होती.

सरपंच डवर यांच्या नोटिशीच्या आधारे प्रांताधिकारी प्रधान यांनीही स्टोन क्रेशर व्यावसायिकास नोटीस बजावली होती. ही कारवाई टाळण्यासाठी व्यावसायिकाने सरपंच आणि प्रांताधिकाऱ्यांची जाऊन भेट घेऊन विनंती केली होती. मात्र सरपंच यांनी ही कारवाई टाळण्यासाठी प्रांताधिकारी प्रधान यांना 10 लाख रुपये आणि स्वतःला दरमहा एक लाख रुपयांची मागणी केली होती.

व्यावसायिकाने आज सकाळी प्रांताधिकारी यांच्या निवासस्थानी जाऊन सरपंच यांनी आपल्यासाठी दहा लाखाची मागणी केली असल्याचे सांगितले. त्यावर प्रांताधिकार्‍यांनी संमती दर्शवून सरपंच यांच्याकडे पूर्तता करण्यास बजावले. आज दुपारी दोन वाजता सरपंच डवर आपल्या स्वतःच्या आलिशान मोटारी मधून प्रांताधिकारी कार्यालय जवळ आले होते.

व्यावसायिकाकडून प्रांताधिकारींसाठी पाच लाख आणि स्वतःसाठी 50 हजार रुपये स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंध पथकाचे पोलिस उपाधीक्षक आदिनाथ बुधवंत आणि त्यांच्या पथकाने सरपंचांना रंगेहात पकडले. त्यानंतर तातडीने प्रांताधिकारी कार्यालयात जाऊन प्रांताधिकारी प्रसेनजित प्रधान यांनाही ताब्यात घेतले.

आज रविवार सुट्टीचा दिवस असतानाही प्रांताधिकारी कचेरीत आले होते. महसूल खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्याला लाच प्रकरणी अटक झाल्याने महसूल खात्यासह जिल्ह्यात खळबळ माजली आहे.

Back to top button