महाराष्ट्रातील एकमेव हत्ती कॅम्प गुजरातला हलविण्याचा घाट | पुढारी

महाराष्ट्रातील एकमेव हत्ती कॅम्प गुजरातला हलविण्याचा घाट

गडचिरोली, पुढारी ऑनलाईन : महाराष्ट्रातील एकमेव अहेरी तालुक्यातील कमलापूर येथील वनविभागाच्या हत्ती कॅम्पमधील हत्तींना गुजरातमधील प्राणी संग्रहालयात हलविण्यात येणार आहे. ‘अंबानी’च्या प्रेमापोटी गडचिरोली जिल्ह्यातील एकमेव हत्ती कॅम्प बंद करण्याचा घाट राज्य शासनानेच घातल्याने नागरिकांमध्ये रोष व्यक्त केला जात आहे.

गुजरातमधील जामनगरच्या भागात मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या माध्यमातून देशातील सर्वांत मोठे प्राणी संग्रहालय सुरु करण्यात येत आहे. सुमारे २५० एकर जागेतील या प्राणी संग्रहालयात देशभरातील विविध ठिकाणचे दुर्मीळ प्राणी नेण्यात येणार आहेत. केंद्र सरकारच्या वने आणि पर्यावरणमंत्रालयाच्या अख्त्यारितील केंद्रीय प्राणी प्राधिकरणाने १२ फेब्रुवारी २०१९ ला रिलायंसच्या या प्राणीसंग्रहालयास मंजुरी दिली आहे.

२०२० मध्ये गुजरातमधील १२ चित्यांना पकडून या प्राणीसंग्रहालयात नेण्यात आले. आता कमलापूर येथील हत्तींना नेण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. या हत्तींना दोन गटात नेण्यात येणार आहे. रिलायन्स राधे क्रिष्णा एलिफंट वेल्फेअर ट्रस्ट हत्तींचे स्थानांतरण करणार आहे. कमलापूरचे हत्ती कॅम्प पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्यात आले आहे. त्यामुळे हत्ती पाहण्यासाठी दुरदुरुन पर्यटक येत असतात. परंतु महाराष्ट्रातील एकमेव हत्ती कॅम्प बंद पाडण्याच्या हालचाली होत असल्याने नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. कमलापूर ग्रामपंचायत याबाबत ठराव घेणार असल्याची माहिती आहे.

कसे आहे कमलापूरचे हत्ती कॅम्प

अहेरी, एटापल्ली, भामरागड, सिरोंचा हे तालुके घनदाट जंगलाने व्यापलेले असून, तेथे मोठमोठे मूल्यवान प्रजातीचे वृक्ष आढळतात. १९६२ मध्ये अहेरी तालुक्यातील कमलापूर वनपरिक्षेत्रात लाकूड वाहतुकीसाठी बसंती आणि महालिंगा या दोन हत्तींना आणण्यात आले होते. त्यावेळी हे हत्ती कमलापासून १४ किलोमीटर अंतरावरील कोलामार्का येथील जंगलात होते.

हळूहळू हत्तींची संख्या वाढली. पुढे कोलामार्का जंगलात हत्तींना पिण्याच्या पाण्याची सोय होत नसल्याने त्यांना कमलापूरपासून ४ किलोमीटर अंतरावरील दामरंचा मार्गावरील निसर्गरम्य परिसरात आणण्यात आले. येथे तलाव, मोकळे रान आणि हत्तींसाठी भरपूर नैसर्गिक खाद्य आहे. काही वर्षांपूर्वी या हत्ती कॅम्पला पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्यात आले. पाळीव हत्ती असलेले महाराष्ट्रातील हे एकमेव हत्ती कॅम्प आहे.

२८ जून २०२० पर्यंत या कॅम्पमध्ये १० हत्ती होते. परंतु परंतु २९ जुन २०२० रोजी आदित्य नामक चार वर्षीय हत्तीचा चिखलात फसून मृत्यू झाला. त्यानंतर ३ ऑगस्ट २०२१ रोजी ३२ महिने वयाच्या सई नामक हत्तीणीचा मृत्यू झाला. पुढे ६ ऑगस्ट २०२१ रोजी अर्जून नामक हत्तीनेही प्राण सोडला. सध्या अजित, मंगला, बसंती, गणेश प्रियंका, रुपा आणि राणी ५ मादी आणि २ नर असे ७ हत्ती उरले होते. काल (ता.८) मंगला नामक हत्तीने पिलास जन्म दिल्याने ८ हत्ती झाले आहेत. वनविभागाचे कर्मचारी, माहुत आणि चाराकटर हे दररोज संध्याकाळी हत्तींना जंगलात सोडतात. सकाळी पुन्हा या हत्तींना हत्ती कॅम्पमध्ये आणून त्यांना भोजन देतात.

७ हत्ती पाठविणार : वनसंरक्षक

कमलापूरच्या हत्ती कॅम्पमधून हत्ती पाठविण्याविषयी आम्हाला वनविभागाकडून पत्र प्राप्त झाले आहे. कमलापूर येथील ४ आणि पातानिल येथील ३ असे एकूण ७ हत्ती गुजरातला हलविण्यात येणार आहेत. त्यातील काही हत्तींचे वय झाले आहे. शिवाय माहुताचे पदही रिक्त आहे, अशी माहिती गडचिरोलीचे प्रादेशिक वनसंरक्षक डॉ. किशोर मानकर यांनी सांगितले.

Back to top button