पुढारी वॉच : एसटीचे पुणे विभागीय कार्यालय की दारूचा अड्डा; परिसरातच हाय-फाय दारूच्या बाटल्या

पुढारी वॉच : एसटीचे पुणे विभागीय कार्यालय की दारूचा अड्डा; परिसरातच हाय-फाय दारूच्या बाटल्या
Published on
Updated on

पुणे; प्रसाद जगताप

एसटीच्या पुणे विभागीय कार्यालयाच्या परिसरातच हाय-फाय ब्रँडच्या दारूच्या बाटल्यांचा खच पडला आहे. त्यामुळे एसटीचे हे विभागीय सरकारी कार्यालय दारूड्यांचे आगारच बनले आहे की, काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच, येथे झालेल्या या हाय-फाय दारूच्या पार्ट्या येथीलच अधिकार्‍यांच्या होत्या की काय? असा येथील चित्र पाहून प्रश्न उपस्थित होत आहे.

एकीकडे एसटी कर्मचारी आपल्या मागणीसाठी गेल्या दोन महिन्यांपासून दिवस-रात्र आंदोलन करत आहेत. या आंदोलनामुळे एसटी कर्मचार्‍यांना साधा पगार सुध्दा मिळालेला नाही. परिणामी, आधीच कमी पगार आणि त्यातच पगार मिळत नसल्यामुळे त्यांना घरसंसार कसा चालवायचा? एकवेळचे अन्न मिळविण्याची भ्रांत सुरू आहे. मात्र, दुसरीकडे एसटीच्या पुणे विभागीय कार्यालय परिसरात चक्क दारूच्या पार्ट्या सुरू असे चित्र समोर येत आहे.

या दारूच्या पार्ट्या साध्या सुध्या दारूच्या ब्रँडच्या नसून, चक्क हाय-फाय ब्रँडच्या असल्याचे समोर आले आहे. कारण येथे पडलेल्या दारूच्या बाटल्या महागड्या असून, त्या पिणे कर्मचार्‍यांना परवडणारे नाही. तसेच, बाहेरून कोणी आत आणून टाकल्या का? तर तसेही शक्य नाही. कारण, एसटीच्या या कार्यालयाला 24 तास 'सुरम सुरक्षा' ची सिक्युरिटी तैनात असते. मग या बाटल्या कोणाच्या? हे सरकारी कार्यालय आहे की, दारूड्यांचा अड्डा? असा सवाल आता उपस्थित होत आहे. यासंदर्भात एसटीच्या अधिकार्‍यांशी संपर्क केला असता होऊ शकला नाही.

सुरक्षा रक्षक असताना दारू पार्टी रंगतेच कशी?

एसटीच्या पुण्यातील शंकरशेठ रोडवर असलेल्या विभागीय कार्यालयाला 24 तास सिक्युरिटी आहे. येथे ये-जा करणार्‍या प्रत्येकाची चौकशी करण्यात येते. मात्र, असे असताना सुध्दा येथे हाय-फाय ब्रँडच्या दारूच्या बाटल्या आल्या कशा? आतमध्येच दारूची पार्टी कोणाच्या आशीर्वादाने रंगली? विभागनियंत्रकांचे कार्यालयावर लक्ष आहे की नाही. असा सवाल सध्या उपस्थित होत आहे.

एसटी कर्मचारी उपाशी अधिकारी तुपाशी…

एकीकडे एसटी कर्मचारी त्यांच्या हक्काच्या मागणीसाठी राज्यभरात लढत आहेत. त्यांच्यावर निलंबन, सेवा समाप्ती, पगार बंद यांसारख्या कडक कारवाया सुरू आहेत. तर दुसरीकडे वरिष्ठ अधिकार्‍यांना नुसता बसून पगार सुरू आहे. त्यातच ठेकेदारांच्या शिवशाही, शिवनेरी बस सुरू असल्यामुळे ठेकेदारांची चांदी सुरू आहे. मात्र, यात सर्वसामान्य माणूस जादा भाडे भरून पिसला जात आहे. शासनाने तात्काळ संपावर तोडगा काढण्याची गरज असताना, सर्रासपणे दुर्लक्ष करून शासन सर्वसामान्यांचे हाल करत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news