पुणे; पुढारी ऑनलाईन डेस्क
TET Scam : टीईटी परीक्षा गैरव्यवहार प्रकरणी पुणे पोलिसांनी आणखी दोघांना अटक केली आहे. २०१८ मध्ये राज्य शिक्षण परिषदेचे अध्यक्ष असलेले व माध्यमिक व उच्च माध्यमिक औरंगाबाद बोर्डाचे विभागीय आयुक्त सुखदेव डेरे याला सायबर पोलिसांनी अटक केली. त्याच्याबरोबरच जीए टेक्नॉलॉजीचे प्रमुख अश्विनकुमार यालाही पोलिसांनी बंगळूर येथून ताब्यात घेऊन अटक केली आहे. त्यामुळे टीईटी परीक्षा पेपर गैरव्यवहार प्रकरणी आता अटक केलेल्यांची संख्या ५ झाली. धक्कादायक माहिती म्हणजे टीईटी परिक्षेतील ५०० जणांचे निकाल बदलले असण्याची शक्यता पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी व्यक्त केली आहे. या कारवाईबाबत त्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.
शिक्षक भरती पात्रता परीक्षेतील (टीईटी) गैरव्यवहाराची व्याप्ती ५० जणांपर्यंत पोहोचलेली आहे. या प्रकरणातील दलालांची संख्या मोठी आहे. तीन केसेस ओपन केल्या आहेत. नवीन दोघांना अटक केली असून उर्वरित आरोपींना लवकरच ताब्यात घेणार आहे. याबाबत अधिक तपास केला जात आहे. अटक केलेल्यांकडे लॅपटॉप, पेन ड्राईव्ह मिळाला आहे, असे अमिताभ गुप्ता यांनी सांगितले.
सुखदेव डेरे हे २०१८ मध्ये महाराष्ट्र राज्य शिक्षण परीक्षा परिषदेचे आयुक्त होते. २०१८ च्या टीईटी पेपर (TET Scam) फोडण्यामध्ये डेरे यांचाही हात असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाल्याने रात्री त्यांना अटक करण्यात आली.
जी ए सॉफ्टवेअरच्या महाराष्ट्राची जबाबदारी अश्विनकुमार यांच्यावर होती. त्यांच्याशी संगनमत करुन डेरे व तुकाराम सुपे यांनी परीक्षार्थींकडून एजंटांमार्फत पैसे घेऊन त्यांना पास केल्याची माहिती समोर आली आहे.
शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) गैरव्यवहार प्रकरणात महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचा आयुक्त तुकाराम सुपे याने मोठ्या प्रमाणात माया गोळा केल्याचे समोर आले आहे. त्याच्या चौकशीत त्याच्याकडून लपवून ठेवलेली आणखी 1 कोटी 59 लाखांची रोकड पोलिसांनी जप्त केली आहे. त्याबरोबरच त्याच्याकडून 44 वेगवेगळ्या प्रकारचे १४५ तोळे सोन्याचे दागिने असलेला डबा शोधून काढत मोठे घबाड जप्त केले आहे. त्याच्याकडून आतापर्यंत 2 कोटी 47 लाख 81 हजारांची रोकड आणि दागिने जप्त केले आहे.
हे ही वाचा :