टीईटी गैरव्यवहार प्रकरण : परीक्षा परिषदेचा माजी आयुक्त सुखदेव डेरे यालाही अटक | पुढारी

टीईटी गैरव्यवहार प्रकरण : परीक्षा परिषदेचा माजी आयुक्त सुखदेव डेरे यालाही अटक

पुणे : पुढारी वृत्तसेवा

२०१८ मध्ये राज्य शिक्षण परिषदेचे अध्यक्ष असलेले व माध्यमिक व उच्च माध्यमिक औरंगाबाद बोर्डाचे विभागीय आयुक्त सुखदेव डेरे याला सायबर पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याबरोबरच जी. ए. सॉफ्टवेअर तत्कालीन संचालक अश्विनकुमार यालाही पोलिसांनी बंगलुरु येथून ताब्यात घेऊन अटक केली आहे. त्यामुळे टीईटी परीक्षा पेपर गैरव्यवहार प्रकरणी आता अटक केलेल्यांची संख्या ५ झाली आहे. शिक्षक भरती पात्रता परीक्षेतील (टीईटी) गैरव्यवहाराचे लोण दिवसेंदिवस वाढत असून आता ते २०१८ च्या परीक्षेपर्यंत पोहचले आहे.

सुखदेव डेरे हे २०१८ मध्ये महाराष्ट्र राज्य शिक्षण परीक्षा परिषदेचे आयुक्त होते. २०१८ च्या टीईटी पेपर फोडण्यामध्ये डेरे यांचाही हात असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाल्याने रात्री त्यांना अटक करण्यात आली आहे.

डॉ. प्रितीश देशमुख याच्या अगोदर जी ए सॉफ्टवेअरच्या महाराष्ट्राची जबाबदारी अश्विनकुमार यांच्यावर होती. त्यांच्याशी संगनमत करुन डेरे व तुकाराम सुपे यांनी परीक्षार्थींकडून एजंटांमार्फत पैसे घेऊन त्यांना पास केल्याची माहिती समोर आली आहे.

यावरुन जी. ए. सॉफ्टवेअरमध्ये प्रितीश देशमुख यांच्या अगोदरही तेथील संचालक हे वरिष्ठांशी संगनमत साधून परीक्षेमध्ये गैरव्यवहार करीत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळेच पुणे पोलिसांनी २०१६ पासून झालेल्या सर्व टीईटी परीक्षांची चौकशी करण्यास सुरुवात केली आहे. त्यातूनच हा प्रकार समोर आला आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता याबाबत दुपारी पत्रकार परिषद घेऊन अधिक माहिती देणार आहेत.

शिक्षक पात्रता परिक्षेतील (टीईटी) गैरव्यवहार चव्हाट्यावर आणून पुणे पोलिसांच्या सायबर पोलिसांनी कोट्यवधींचे घबाड जप्त केले आहे. टीईटीमधील मोठ्या प्रमाणावरील भ्रष्टाचार झाल्याची शक्यता पाहता 2016 पासून घेण्यात आलेल्या परिक्षेची चौकशी करण्यात येणार असल्याची माहीती वरिष्ठ सुत्रांनी दिली. त्यामुळे गैरमार्गाने पास होऊन नोकरीला लागलेल्यांचेही धाबे दणाणले आहे.

आरोग्य भरती पेपर फुटीचा तपास करत असताना पेपरफुटीचा मास्टर माईंड ठरलेल्या डॉ. प्रितीश देशमुख याच्या चौकशीत महत्वपूर्ण बाबी उघड झाल्या. त्या घरात टीईटी अपात्र ठरलेल्या उमेदवारांची हॉल तिकीटे सापडली अन तपास टीईटीमध्ये झालेल्या गैरव्यवहाराच्या दृष्टीकोनातून तपास सुरू झाला. त्यामध्ये राज्य शिक्षण परिषदेचा आयुक्त तुकाराम सुपेचे हात गोवले गेल्याची माहिती समोर आल्यानंतर त्याच्याकडे केलेल्या अधिक तपासामध्ये कोट्यवधींचे घबाड पोलिसांच्या हाती लागले आहे. त्याच्याकडे आतापर्यंत मिळालेली संपत्ती पाहता गैरव्यवहार केवळ एका वर्षातला नसल्याचे दिसून येत आहे.

डॉ. प्रितीश देशमुख याच्या तपासात त्याने 2019-20 टीईटीमधील सुपेचा वाटा हा 1 कोटी 70 लाखांचा होता. परंतु, त्याच्याकडे सापडलेले घबाड हे मोठ्या प्रमाणावर असून त्यामुळे मागील काही वर्षात झालेली टीईटी परिक्षाही आता चौकशीच्या फेर्‍यात आली आहे. 2016 पासूनच्या टीईटी परिक्षेची चौकशीचे सुतोवाच वरिष्ठ सुत्रांनी दिले आहेत. त्यामुळे पैशाच्या जोरावर नोकरी मिळविणारेही या निमित्ताने चौकशीच्या फेर्‍यात आडकण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे.

शैक्षणिक क्षेत्रातील वाढती बेरोजगारी, शिक्षण क्षेत्रातील कमी होत जाणारे नोकर्‍यांचे प्रमाण कित्येक वर्षापासून न झालेली शिक्षक भरती अशा अनेक समस्या तरूणांपुढे उभ्या असताना शासनाकडूनच घेण्यात आलेल्या शिक्षक भरतीचा घोटाळा समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. शिक्षक पात्रता परिक्षेतील गैरव्यवहार समोर आल्यानंतर पुणे पोलिसांनी या रॅकेटची पाळेमुळे खोदून काढण्याची मोहिम हाती घेतली आहे. देशमुख याच्याकडे मिळून आलेल्या प्रवेश पत्रावरून हा घोटाळा चव्हाट्यावर आला आहे, त्यामुळे पोलिसांनी मागिल पाच वर्षामध्ये जेवढ्या टीईटी परिक्षा झाल्या त्या सर्व परिक्षांची चौकशी करण्यास सुरूवात केली आहे.

Back to top button