कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (महा-टीईटी) रविवारी जिल्ह्यातील 33 केंद्रांवर घेण्यात आली. मात्र, एस.टी. कर्मचारी संपाचा फटका शेकडो पात्र उमेदवारांना बसला. काही उमेदवार उशिरा आल्याने त्यांना 'टीईटी' परीक्षेला मुकावे लागले.
उशिरा आल्याचे कारण देत केंद्रप्रमुखांनी अनेक परीक्षार्थींना प्रवेश नाकारत गेट बंद केले. यामुळे शहरातील सर्वच परीक्षा केंद्रांवर गोंधळ उडाला. उमेदवारांना आर्थिक भुर्दंडाबरोबरच मोठा मनस्ताप सहन करावा लागला.
गेल्या तीन वर्षांपासून वेगवेगळ्या कारणांमुळे टीईटी परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. राज्य परीक्षा परिषदेने अखेर 21 नोव्हेंबर रोजी परीक्षा घेतली. शहरासह ग्रामीण, दुर्गम भागातील हजारो उमेदवार टीईटी परीक्षेला बसले होते. सांगली, सातारा, धुळे, बेळगावसह इतर ठिकाणांहून उमेदवार परीक्षेसाठी कोल्हापुरात आले होते. रविवारी सकाळपासून उमेदवारांकडून शहरातील परीक्षा केंद्रांची शोधाशोध सुरू होती. काही महिला उमेदवार आपल्या लहान मुलांना घेऊन आल्या होत्या. त्यांना अडचणींचा सामना करावा लागला.
साडेदहा वाजता पेपर क्र. 1 सुरू होण्यापूर्वी काही उमेदवार पाच मिनिटे उशिरा आले. त्यांनी केंद्रप्रमुखांना केंद्रावर प्रवेश देेण्याची विनंती केली. मात्र, त्यांना प्रवेश नाकारण्यात आला. या सर्व प्रकाराने शहरातील विविध परीक्षा केंद्रांवर काही काळ गोंधळाचे वातावरण होते. परीक्षा केंद्रांबाहेर मोठा पोलिस बंदोबस्त होता.
नेहरू हायस्कूल, गर्ल्स हायस्कूल केंद्रांवर गोंधळ
नेहरू हायस्कूल व ज्यु. कॉलेज केंद्रावर सकाळी दहानंतर काही उमेदवार धावत-पळत आले. त्यांनी परीक्षेसाठी आत घ्यावे, अशी विनंती संबंधितांना केली. मात्र, वेळेचे कारण देत त्यांना प्रवेश दिला गेला नाही. बराच वेळ परीक्षार्थी केंद्राबाहेर उभे होते. शिवाजी पेठ परिसरातील गर्ल्स हायस्कूल केंद्रावर उशिरा आलेल्या काही उमेदवारांना प्रवेश देण्यात आला नाही. यावेळी उमेदवारांनी बाहेरच ठिय्या मारला. माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी केंद्रास भेट दिली. यावेळी पात्र उमेदवारांनी त्यांच्यासमोर गार्हाणे मांडले.
एस.टी.च्या संपामुळे यायला उशीर झाला, यात आमचा काय दोष? असा सवाल त्यांनी केला. यावेळी केंद्रप्रमुख व उमेदवारांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. काही जणांनी लोकप्रतिनिधींना फोन करून घडलेल्या प्रकारची माहिती दिली. परंतु, याचा काहीच फायदा झाला नाही.
बर्याच उमेदवारांना पेपर क्र. 1 देता आला नाही. दुपारच्या सत्रातील पेपर क्र. 2 काही उमेदवार न देणेच पसंद करीत गावी निघून गेले. राजर्षी छत्रपती शाहू महाराज हायस्कूल व ज्यु. कॉलेज, कमला कॉलेज, वसंतराव देशमुख हायस्कूल, गर्ल्स हायस्कूल, शिवाजी पेठ केंद्रावर उशिरा आलेल्यांना प्रवेश देण्यात आला नाही. त्यामुळे भवितव्य अडचणीत आल्याचे पात्र उमेदवारांनी सांगितले.
पेपर क्र. 1 सकाळी 10.30 ते दुपारी 1, तर पेपर क्र. 2 दुपारी 2 ते 4.30 या वेळेत झाला. 300 गुणांचे दोन पेपर होते. पेपर क्र. 1 साठी नोंदणी केलेल्या 8,731 विद्यार्थ्यांपैकी 7,385 विद्यार्थी परीक्षेला बसले. उपस्थितीची टक्केवारी 84.61 होती. 1,346 विद्यार्थी गैरहजर राहिले. पेपर क्र. 2 साठी 8,873 विद्यार्थ्यांपैकी 7,806 विद्यार्थी हजर होते. 87.97 टक्के विद्यार्थी उपस्थित होते. 1,067 विद्यार्थी अनुपस्थित होते, अशी माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांनी दिली.
'परीक्षेला निर्धारित वेळेत उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. उशिरा आलेल्या उमेदवारांसाठी काहीही करू शकत नाही,' असे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी म्हटले आहे.