दक्षिण आफ्रिका दौर्‍यात द्रविडचा कस | पुढारी

दक्षिण आफ्रिका दौर्‍यात द्रविडचा कस

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : भारतीय क्रिकेटमध्ये गेल्या काही महिन्यात अनेक गोष्टी घडताना दिसत आहेत. अशा स्थितीत भारताचा नवीन प्रशिक्षक राहुल द्रविडसाठी दक्षिण आफ्रिका दौरा हा आणखीन आव्हानात्मक झाला आहे.

कर्णधारपदाच्या मुद्द्यावरून बीसीसीआय अध्यक्ष आणि भारताचा कसोटी कर्णधार यामध्ये विवाद निर्माण झाला. याची चर्चा सोशल मीडियावरदेखील होऊ लागली. विराटच्या पत्रकार परिषदेपूर्वी विराट व रोहित शर्मा यांच्यामध्ये विवाद आहे असे वाटत असताना विवाद कोहली वि. गांगुली असाही सामना सुरू झाला. भारतीय संघ मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेत दाखल झाला; पण विवादाने पाठ सोडलेली नाही. यामुळे राहुल द्रविडच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष्य असणार आहे.

भारतीय क्रिकेटमध्ये राजकारण नवीन नाही. गांगुली व ग्रेग चॅपल वादादरम्यान द्रविड संकटमोचक ठरला होता. आता प्रशिक्षक म्हणून त्याच्या खांद्यावर भारतीय संघाला मैदानाबाहेरील विवादातून बाहेर काढणे आणि खेळाडूंना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मैदानात चांगली कामगिरी करण्यासाठी प्रेरित करण्याची मोठी जबाबदारी असेल.

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताची 2021 च्या टी-20 विश्वचषक स्पर्धेतील पहिल्या दोन सामन्यांतील कामगिरी निराशाजनक राहिली होती आणि त्यामुळे भारताला बाद फेरीत पोहोचता आले नव्हते. अनेक क्रिकेट तज्ज्ञांच्या मते असुरक्षित ड्रेसिंग रूमचे वातावरण त्या स्पर्धेत भारताच्या पराभवाच्या कारणांपैकी एक होते.

भारतीय क्रिकेटच्या इतिहासात भारताला दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकता आलेली नाही. यावेळी प्रतिस्पर्धी संघात अनुभवाची कमतरता आहे; पण आपल्या घरच्या मैदानावर ते भारताचा मजबूतपणे सामना करतील. विराट कोहली, चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे कसोटी क्रिकेटमध्ये फलंदाजीत प्रमुख खेळाडू आहेत; पण गेल्या दोन वर्षांत त्यांना चमकदार कामगिरी करता आलेली नाही. या फलंदाजांना कॅगिसो राबाडा आणि एन्रिच नॉर्त्जेसारख्या गोलंदाजांचा सामना करावा लागेल.

यासोबतच विराट आणि द्रविडची जोडी संघर्ष करीत असलेल्या पुजारा व रहाणेला अंतिम एकादशमध्ये संधी देतात का हे पाहावे लागेल. भारताला रोहित शर्मा, शुभमन गिल आणि रवींद्र जडेजा यांची कमतरता जाणवेल. या तिघांनाही दुखापतीमुळे मालिकेला मुकावे लागले आहे. त्यामुळे प्रशिक्षक म्हणून द्रविडला आपल्या खेळाडूंकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल.

द्रविड गुरुजी मैदानात; अश्विनवर विशेष लक्ष

जोहान्सबर्ग : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना 26 डिसेंबरपासून सेंच्युरियन येथे सुरू होणार आहे. भारतीय संघाने या सामन्यासाठी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड याच्या मार्गदर्शनाखाली सराव सुरू केला आहे.

भारताला 29 वर्षांत दक्षिण आफ्रिकेत एकही कसोटी मालिका जिंकता आलेली नाही; पण यंदा द्रविड-विराट कोहली ही जोडी हा इतिहास बदलण्याच्या तयारीत आहेत. राहुल द्रविडने दक्षिण आफ्रिकेच्या कमकुवत बाजूवर हल्ला करण्याचा ‘मास्टर प्लॅन’ तयार केला आहे. फिरकी गोलंदाजासमोर आफ्रिकन संघ नेहमी चाचपडताना दिसतो आणि त्यामुळेच द्रविड आर. अश्विनसोबत योजना तयार करीत आहे.

द्रविडने खेळाडूंसोबत सराव सत्रात सहभाग घेतला. यावेळी त्याने खेळाडूंना काही टिप्सही दिल्या. रवींद्र जडेजा, अक्षर पटेल या फॉर्मात असलेल्या फिरकीपटूंनी दुखापतीमुळे या मालिकेतून माघार घेतली. त्यामुळे आता संपूर्ण भार हा आर. अश्विनच्या खांद्यावर आहे. त्यामुळे द्रविडने आर. अश्विनसोबत बराच काळ चर्चा केली. मागच्या वेळेस अश्विन सेंच्युरियन येथे खेळला होता, तेव्हा त्याने पाच विकेटस् घेतल्या होत्या.

Back to top button