इंद्रायणीकाठी लोटला वैष्णवांचा सागर! एकादशीनिमित्त राज्यभरातून दीडशे दिंड्या दाखल | पुढारी

इंद्रायणीकाठी लोटला वैष्णवांचा सागर! एकादशीनिमित्त राज्यभरातून दीडशे दिंड्या दाखल

खेळ मांडियेला वाळवंटी घाई । नाचती वैष्णव भाई रे ।

क्रोध अभिमान गेला पावटणी । एक एका लागतील पायीं रे ।।

गोपीचंदनउटी तुळसीच्या माळा । हार मिरविती गळां ।

टाळ मृदंग घाई पुष्प वर्षाव । अनुपम्य सुखसोहळा रे ।।

आळंदी : श्रीकांत बोरावके : टाळ-मृदंगाचा टिपेला पोहचलेला भक्तिकल्लोळ… माउली- माउलीचा जयघोष… वैष्णवांच्या मेळ्याने बहरून आलेला इंद्रायणीकाठ… माउलींच्या दर्शनासाठी लागलेल्या लांबच लांब रांगा… अशा वातावरणाने सोमवारी (दि. २९) अलंकापुरी दुमदुमून गेल्याचे पाहायला मिळाले.

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरमहाराज यांच्या ७२५ व्या संजीवन समाधी सोहळ्यात एकादशीच्या पूर्वसंध्येला मराठवाडा, विदर्भ, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र, कोकणातून साेमवारी आळंदीत दिंड्या दाखल झाल्या. या कार्तिकी वारीत मंगळवारी (दि. ३०) आलेल्या एकादशीच्या भक्ती पर्वणीचा योग साधण्यासाठी भाविक माेठ्या संख्येने आळंदीत आल्याचे पाहायला मिळाले. इंद्रायणी घाटावर त्यांनी फुगडीचा फेरही धरला. काहींनी टाळ-मृदंगाच्या गजरात देहभान विसरून नाचण्याचा आनंद लुटला.

पहाटेपासूनच वारकऱ्यांच्या राहुट्या व धर्मशाळांमधून अभंगाच्या सुरावटी निघू लागल्या आहेत. टाळ-मृदंगाच्या गजराने आसमंत भरून गेला आहे. तसेच स्नानासाठी इंद्रायणीच्या तीरावर वारकऱ्यांची गर्दी होऊ लागली आहे. प्रशासनाकडूनही कार्तिकीसाठी इंद्रायणीला पाणी सोडण्यात आले आहे. यामुळे नितळ पाण्याप्रमाणेच भाविकांची भक्तीही दुथडी भरून वाहत आहे.

Omicron : ओमिक्राॅन ठरू शकतो कोरोनाविरुद्ध गुड न्यूज

माउलींच्या मंदिरातही पहाटेपासून विविध धार्मिक विधीला सुरुवात झाली होती. स्नानानंतर भाविकांनी माउलींच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी दर्शनबारीत उभे हाेते. आळंदी पालिका व जिल्हा प्रशासनाकडून विविध सोई-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

हेही वाचलं का?

Back to top button