IND vs NZ Test : कानपूर कसोटी सामना अनिर्णीत | पुढारी

IND vs NZ Test : कानपूर कसोटी सामना अनिर्णीत

कानपूर : पुढारी ऑनलाईन

कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना अनिर्णित राहिला. त्यामुळे रोमहर्षक लढतीत भारत विजयापासून एक विकेट दूर राहिला. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या नव्या पर्वातील भारताचा दुसरा सामना अनिर्णित राहिला आहे. या सामन्यात किवी संघासमोर २८४ धावांचे लक्ष्य होते आणि संघाने शेवटच्या दिवशी दमदार फलंदाजी करताना सामना अनिर्णित ठेवला. सामना ड्रॉ करण्यासाठी पदार्पण करणाऱ्या रचिन रवींद्रने ९१ चेंडू खेळून नाबाद १८ धावा काढल्या. तर त्याला एजाज पाटेलने साथ दिली आणि सामना अनिर्णित राखण्यात मोठी भूमिका बजावली. या जोडीने शेवटच्या विकेटसाठी एकूण ५२ चेंडूंचा सामना केला आणि पराभव टाळला.

२८४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडने दुसऱ्या डावात ९८ षटके फलंदाजी केली आणि ९ विकेट गमावल्या. शेवटच्या ५२ चेंडूतही भारतीय गोलंदाजांना शेवटची विकेट काढता आली नाही. त्यामुळे सामन्याचा निकाल अनिर्णित राहिला. भारतात २०१७ नंतर पहिल्यांदाच कसोटी सामना अनिर्णित राहिला आहे. त्याचबरोबर न्यूझीलंडच्या संघाने गेल्या सात सामन्यांमध्ये प्रथमच एक सामना अनिर्णित ठेवला आहे.

रचिनने न्यूझीलंडला वाचवले

या सामन्यात न्यूझीलंडकडून कसोटी पदार्पण करणाऱ्या रचिन रवींद्रने शानदार खेळ दाखवत संघाला पराभवापासून वाचवले. रचिन ९१ चेंडूत २ चौकारांच्या मदतीने १८ धावा केल्या. त्याची ही संयमी खेळी संघासाठी मोलाची ठरली. त्याच्या बचावात्मक खेळामुळे भारतीय संघ शेवटची विकेट घेऊ शकला नाही. भारताकडे जवळपास ९ षटकांचा खेळ शिल्लक होता; ज्यामध्ये त्यांना शेवटची विकेट घ्यायची होती. परंतु रवींद्र जडेजा, आर अश्विन आणि अक्षर पटेल अपयशी ठरले. रचिनने या तिघा गोलंदाजांना कडवी झुंज दिली, ज्यात तो यशस्वीही झाला.

 

Back to top button