अनैतिक संबंधाच्या संशयातून कोंढव्यात सुरक्षारक्षकाचा खून | पुढारी

अनैतिक संबंधाच्या संशयातून कोंढव्यात सुरक्षारक्षकाचा खून

पुणे ; पुढारी वृत्तसेवा

अनैतिक संबंधाच्या संशयातून शाळेवर काम करणार्‍या सुरक्षारक्षकाचा टोळक्याने हल्ला करून कोंढव्यात खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दरम्यान, खून झालेल्या व्यक्तीसह त्याच्या जखमी साथीदाराला रिक्षातून रहदारीच्या ठिकाणी टाकून आरोपींनी पळ काढला. रवी कचरू नागदिवे (वय 50, रा. नेवसेमळा, देवाची उरूळी) असे खून झालेल्या व्यक्‍तीचे नाव आहे. तर त्याचा मित्र बालाजी चव्हाण या घटनेत गंभीर जखमी झाला आहे. या घटनेने कोंढव्यात  एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत गुन्हे निरीक्षक गोकुळ राऊत यांनी सांगितले, रवी नागदिवे हे उरूळी देवाची येथील एका शाळेत सुरक्षारक्षक म्हणून काम करत होते. तर त्यांचा साथीदार बालाजी चव्हाण हा रिक्षा चालक आहे. रवी नागदिवे यांची 53 वर्षाची मैत्रीण आहे. तिचे येवलेवाडीतील डोंगराजवळ असलेल्या प्लॉटींगमध्ये घर आहे. त्या प्लॉटवरील एका खोलीत ती राहत होती. रवी हा तिला त्या ठिकाणी भेटण्यासाठी त्याचा मित्र बालाजी चव्हाण याच्या रिक्षातून जात असत. दोन ते तीन वेळा बालाजी हा नागदिवे यांच्याबरोबर तेथे गेला होता. त्यानंतर नागदिवेंनी उरूळी देवाची येथे राहणार्‍या एका महिलेशी बालाजीची ओळख करून दिली होती.

गदिवे, बालाजी हे दोघेजण येवलेवाडी येथील मैत्रिणीला भेटण्यासाठी गेले

रविवारी नागदिवे, बालाजी हे दोघेजण येवलेवाडी येथील नागदिवेची मैत्रीणीला भेटण्यासाठी गेले होते. त्यावेळी तेथील प्लॉटींगच्या संबधीत सुपरवायझरसह इतरांना नागदिवेचा संबंधीत महिलेशी गैरसंबंध असल्याचा संशय आला. तेथे असलेल्या खोलीचा वापर गैरकृत्यासाठी करत असल्याचाही त्यांना संशय होता. याच कारणातून सोमवारी दुपारी नागदिवे, बालाजीला संबंधीत सुपरवायझरने भेटण्यासाठी येवलेवाडी येथील त्या प्लॉटच्या ठिकाणी बोलविले. त्यावेळी नागदिवे हे त्याच्या कामावर होते. तर बालाजी हा शिवाजीनगर येथे होता.

टोळक्याने बांबूने लाथाबुक्क्यांनी केली बेदम मारहाण

नागदिवे आणि बालाजी उंड्री येथे एकत्र भेटले. त्यानंतर येवलेवाडीतील प्लॉटवर गेले. तेथे गेल्यानंतर त्‍यांना सुरू असलेल्या प्रकाराबाबत विचारणा करण्यात आली. नंतर याच कारणावरून तेथे उपस्थित असलेल्या चार ते पाच जणांच्या टोळक्याने त्यांना बांबूने लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. नागदिवे यांचा मृत्यू झाला. बराच वेळ नागदिवे आणि बालाजी याला जखमी अवस्थेत डांबून ठेवून नंतर तेथील दोन संशयीत आरोपींनी बालाजीच्या रिक्षात दोघांना कोंबले. त्यांना उंड्रीतील चौकाजवळील रस्त्यालगत सोडून तेथून पलायन केले.

थोड्याच वेळात नागरिक तेथे जमा झाले. जखमी अवस्थेत असलेल्या बालाजीने रस्त्याने जाणाऱ्या एका नागरिकाकडून फोन घेऊन घरी फोन करून बोलवून घेतले. बालाजी आणि नागदिवे यांना हडपसर येथील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिस
घटनास्थळी दाखल झाले. तेथे डॉक्टरांनी नागदिवे याला मृत घोषीत केले. दरम्यान, बालाजीवर सध्या उपचार सुरू असून या प्रकरणी संशयीतांवर रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. संशयीतांच्या शोधासाठी पोलिसांचे पथक रवाना करण्यात आले आहे. तपास गुन्हे निरीक्षक गोकुळ राऊत करीत आहेत.

हेही वाचलं का?

Back to top button