चंद्रकांत पाटील म्हणाले विश्वासघाताने आलेले सरकार पाडण्यासाठी नव्या वर्षाचा मुहूर्त | पुढारी

चंद्रकांत पाटील म्हणाले विश्वासघाताने आलेले सरकार पाडण्यासाठी नव्या वर्षाचा मुहूर्त

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील सरकार हे विश्वासघाताने आलेले आहे. हे सरकार पाडण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. नव्या वर्षामध्ये हे प्रयत्न सुरू होतील. परंतु, इंग्रजी नवीन वर्ष की, मराठी नवीन वर्ष ते परिस्थितीवर ठरविण्यात येईल. कोरोना संपल्याने जनजीवन गतिमान झाले आहे. त्यामुळे राजकारणालाही आता गती येईल, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

आ. पाटील म्हणाले, महाराष्ट्रात विश्वासघाताने सत्तेवर आलेल्या सरकारवर आता जनतेचा विश्वास राहिलेला नाही. कोरोना काळापासून पाहिले तर या सरकारला दारू प्रिय असल्याचे दिसते. कोरोना काळात सर्व व्यवहार बंद असताना दारूची दुकाने सुरू होती. आतादेखील पेट्रोल, डिझेलवरील कर कमी करण्याऐवजी प्रथम दारूवरील कर कमी करण्याला त्यांनी प्राधान्य दिले आहे. दोन वर्षांत कोरोनाची महामारी सुरू होती, या परिस्थितीत राजकारण करण्याएवढे आम्ही असंवेदनशील नाही. कोरोना संपला आहे.

त्यामुळे आता राजकारणालाही गती येईल. त्यामुळे या सरकारला घालविण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. प्रयत्न केले तर नक्की हे सरकार जाईल, असेही ते म्हणाले.

तोट्यातील कंपन्या विकण्याचा भाजपने निर्णय घेता असला, तरी हा निर्णय काँग्रेसच्या इंदिरा गांधी, मनमोहन सिंग यांच्या काळातीलच आहे. तोट्यातील कंपन्या आणि एस.टी. यामध्ये फरक आहे. एस.टी. फार तोट्यात नाही आणि कर्मचार्‍यांना द्यावी लागणारी रक्कमदेखील शंभर कोटींच्या घरात आहे. सरकारी कर्मचार्‍यांना जे देता तेच आम्हाला द्या, अशी एस.टी. कर्मचार्‍यांची मागणी आहे. त्यासाठी बस स्थानकांच्या जागा विकसित केल्या, तरी सहज तेवढी रक्कम उभी राहू शकते. परंतु, या सरकारला जनतेचे काही देणे-घेणे राहिलेले नाही, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

Back to top button