हांडेवाडी ते कात्रज चौकापर्यंत ७० खड्डे !

हांडेवाडी ते कात्रज चौकापर्यंत ७० खड्डे !
Published on
Updated on

पुणे / कोंढवा : हांडेवाडी चौक ते कात्रज चौकादरम्यान 70 खड्डे असल्याचे दै. 'पुढारी'च्या पाहणीत दिसून आले. हेच खड्डे या रस्त्यावरील वाहतूक कोंडीस कारण ठरत आहे. अपघात होत आहेत, शिवाय वाहनचालकांना मणके व पाठदुखीचा त्रास होत आहे. या खड्डे दुरुस्तीकडे प्रशासन गांभीर्याने कधी लक्ष देणार असा, प्रश्न स्थानिक नागरिक विचारत आहेत. कोंढवा, उंड्री, कात्रज, हांडेवाडी येथील रहिवासी व सासवड व सातारा दिशेने जाणारे नागरिक मुख्यत्वेकरून या रस्त्याचा वापर करतात. त्यामुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहनांची गर्दी असते. पाऊस झाल्यावर या मार्गावरील खड्डे पावसाच्या पाण्याने भरतात. हे खड्डे चुकवताना अनेक अपघात घडले आहेत.

हांडेवाडी चौक ते खडीमशीन चौकादरम्यान सिमेंटचे रस्ते आहेत. परंतु, रस्त्याच्या बर्‍याचशा भागात ड्रेनेज मधोमध आहेत. त्याच्या आजूबाजूला खड्डे आहेत. खडीमशीन चौक ते कोंढव्यापर्यंत डांबरी रोड असल्याने या रस्त्यावर अधिकचे खड्डे असल्याचे दिसून आले. तेथून पुढे सिमेंटचा रस्ता असल्याने या ठिकाणी कमी खड्डे असले, तरी ते खराब रस्ता वाहतूक कोंडीस कारण ठरत आहेत. आठ किलोमीटरच्या परिसरातील हे 70 खड्डे व दुसर्‍या बाजूने कात्रजकडून सासवडकडे जाणार्‍या रस्त्यावरही 50 हून अधिक खड्डे दिसून आले.

कोंढव्याच्या पुढे एका उताराच्या परिसरात पाऊस नसतानादेखील पाणी मोठ्या प्रमाणावर साचले असून, यामुळेदेखील वाहतूक कोंडी होत असल्याचे दिसते. त्यामुळे या रस्त्याने चालणार्‍या व दुचाकी चालविणार्‍या नागरिकांना जीव मुठीत घेऊन जावे लागत आहे. काही ठिकाणी मुरमाद्वारे खड्डे बुजवून तात्पुरती मलमपट्टी केलेली दिसते; परंतु या खड्ड्यात भरलेला मुरूमही पुन्हा खड्ड्यातून बाहेर निघून त्या ठिकाणी पुन्हा खड्डे होत आहेत.

तीन कि. मी.च्या रस्त्यावर 81 खड्डे

हांडेवाडी चौक ते कात्रज चौकादरम्यान आठ किलोमीटरच्या परिसरात खड्डे असल्याचे दिसते. मात्र, उपनगरातील आतील रस्त्यावर म्हणजे श्रीराम चौक ते हांडेवाडी रोड चौक अशा तीन किलोमीटरच्या रस्त्यावर तब्बल 81 छोटे-मोठे खड्डे आहेत. विकासकामांच्या नावाखाली येथील रस्ते अर्धवट अवस्थेत सोडण्यात आले आहेत. दोन महिन्यांपासून त्याचे काम पूर्ण केलेले नाही. काही सोसाट्यांसमोर डांबरी रस्त्याची उंची वाढवल्याने पाण्याची तळी साचल्याचे दिसते. श्रीराम चौकाजवळ अशोकनगरसमोर असलेल्या फिफ्थ अ‍ॅव्हेन्यू सोसायटीसमोर थोडा पाऊस पडला तरी तळे साचते. लवकर पाण्याचा निचरा होत नाही. सोसायटीसमोर साचत असलेल्या पाण्यामुळे वाहने घसरून चालक जखमी होण्याचेदेखील प्रकार घडले आहेत.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news