बैलगाडा शर्यतींना आले हायटेक रूप | पुढारी

बैलगाडा शर्यतींना आले हायटेक रूप

पारगाव : पुढारी वृत्तसेवा :  ग्रामीण भागातील बैलगाडा शर्यती आता हायटेक झाल्या आहेत. खेडोपाडी होणार्‍या बैलगाडा शर्यती थेट ऑनलाइन पद्धतीने दाखवल्या जात आहेत. त्याला तरुणवर्गाचा मोठा प्रतिसाददेखील मिळत आहे. यातून अनेकांना चांगला रोजगार उपलब्ध झाला आहे. ग्रामीण भागातील बैलगाडा शर्यतींना मोठी परंपरा आहे. मध्यंतरी बैलगाडा शर्यतींवर बंदी होती. परंतु, त्यानंतर मात्र सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवली. सध्या बैलगाडा शर्यतीचे स्वरूप बदलून गेले आहे. प्रशासनाने बैलगाडा शर्यतींना परवानगी देतानाच नियम व अटींचे पालन करण्याची सक्ती केली आहे. त्यामुळे संयोजकांकडून नियमांचे काटेकोरपणे पालन करीत बैलगाडा शर्यती मोठ्या उत्साहात पार पडत आहेत.

संबंधित बातम्या :

तरुण वर्गात मोठी क्रेझ
बैलगाडा शर्यती या प्राचीन खेळाची सध्याच्या तरुण वर्गात मोठी क्रेझ पहायला मिळत आहे. बैलगाड्यांविषयी मोठे आकर्षण तरुणांमध्ये निर्माण झाले आहे. बैलगाडा मालकांकडून गाडा जुंपणार्‍या तरुणांना आकर्षक गणवेश देखील आता दिले जात आहेत. सध्याचा जमाना हा मोबाईल आणि इंटरनेटचा आहे. खेडोपाडी होणार्‍या बैलगाडा शर्यतीचे लाईव्ह प्रक्षेपण दाखवले जाते. त्यामुळे बैलगाडा शर्यती या घरबसल्या तसेच कुठूनही पाहता येतात. संयोजकांकडून शर्यतीच्या घाटामध्ये खास शूटिंग कॅमेर्‍यांची सोय केली जाते. यातून तरुणांना चांगला रोजगार मिळत आहे. धावत्या बैलगाड्यांचे सेकंद पाहण्यासाठी घाटात डिजीटल स्क्रीन लावली जात आहे, तसेच पहाडी आवाजासाठी डिजिटल साऊंड सिस्टिमदेखील लावली जाते.

अर्थकारणाला बळ
बैलगाडा शर्यंतीमुळे ग्रामीण अर्थकारणाला बळ येत आहे. या शर्यतीसाठी आता ट्रॅक्टर, जेसीबीसोबत कार, दुचाकी, बुलेट अशी मोठी बक्षिसे ठेवली जातात. दोन ते पाच दिवस शर्यती असल्यामुळे हॉटेल, रसवंतीगृहे, वाजंत्री यांना चांगला रोजगार मिळू लागला आहे.

टोकण आणि बक्षिसही ऑनलाइन
अलीकडच्या काळात बैलगाडा शर्यतीसाठी नाव नोंदणीचे टोकणदेखील ऑनलाइन पद्धतीने मिळू लागले आहे. शिवाय बक्षीस वाटपही काही ठिकाणी ऑनलाइन करण्याचा प्रयोग सुरू झाला आहे. यामुळे बैलगाडा मालकांचा वेळ वाचत आहे.

Back to top button