

जेजुरी : पुढारी वृत्तसेवा : महिन्यापूर्वी जेजुरी नगरपालिका सभागृहात आमदार संजय जगताप यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत आमदार जगताप यांनी नगरपालिका प्रशासनाला आरोग्य व स्वच्छतेविषयक सूचना केल्या होत्या. मात्र, त्या सूचनांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप करीत नागरिक त्रस्त झाल्याचे माजी नगरसेवक हेमंत सोनवणे यांनी सांगितले.
जेजुरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत सोनवणे बोलत होते. माजी नगरसेवक अजिंक्य देशमुख, सचिन सोनवणे, महेश दरेकर, रुक्मिणी जगताप उपस्थित होते. सोनवणे म्हणाले की, दि. 6 नोव्हेंबर रोजी जेजुरी नगरपालिका सभागृहात आमदार संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली विविध विकासकामांबाबत आढावा बैठक घेण्यात आली.
संबंधित बातम्या :
या बैठकीत शहरातील स्वच्छता, कचर्याचे व्यवस्थापन, नागरिक व भाविकांचे साथीच्या रोगांपासून संरक्षण व्हावे म्हणून धुरळणी, जंतुनाशक फवारणी, कचरागाड्यांची दुरुस्ती, याकडे नगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे सांगितले होते. त्यावर आमदार जगताप यांनी नगरपालिका प्रशासनाने स्वच्छता, कचर्याचे नियोजन, धुरळणी, फवारणी, घंटागाड्यांची दुरुस्ती करून दररोज नागरिकांना सुविधा द्यावी, याबाबत अधिकारी व कर्मचार्यांनी व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करून रोजच्या रोज माहिती द्यावी, अशा सूचना केल्या. मात्र, या सूचनांकडे संबंधित अधिकारी व कर्मचार्यांनी दुर्लक्ष केले आहे.
सध्या शहरात सर्वत्र कचर्याचे ढीग साचले असून, त्यातून दुर्गंधी येत आहे. सार्वजनिक शौचालये स्वच्छ केली जात नाहीत. घनकचरा व्यवस्थापन प्रक्रिया केंद्रात कचर्याचे विलगीकरण केले जात नाही. संबंधित ठेकेदारास प्रशासन का पाठीशी घालत आहे? यापूर्वी नगरपालिकेत काँग्रेसची सत्ता होती. या काळात बारीक-सारीक गोष्टीस विरोधक टीका करीत होते. सध्या दोन वर्षे प्रशासकीय राजवट असून, पाण्यासह स्वच्छता आदी अनेक प्रश्न असून, याकडे विरोधक गप्प का? असे सवाल विचारून सध्या विरोधक नको त्या गोष्टींत हस्तक्षेप करून चमकोगिरी करीत असल्याचा आरोपही सोनवणे यांनी केला.