Loksabha Election : पुण्यात लोकसभेचे उमेदवार कोण?

Loksabha Election : पुण्यात लोकसभेचे उमेदवार कोण?
Published on
Updated on

पुणे : लोकसभा निवडणूक चार महिन्यांवर येऊन ठेपली असतानाही, भाजप आणि काँग्रेस या दोन प्रमुख पक्षांचा उमेदवार अद्यापही दृष्टिक्षेपात नाही. पुण्याने यापूर्वी देशपातळीवर नेतृत्व करणार्‍या खासदारांची निवड केली. या वेळी मात्र राज्यपातळीवर नेतृत्व करणारा कार्यकर्ताही आढळून येत नाही. त्यामुळे, बाहेरून कोणी मोठा नेता पुण्यातून निवडणूक लढविणार का, याचीही कुजबूज राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. उत्तर भारतातील तीन राज्यांत जोरदार यश मिळाल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला आहे. सर्वच राजकीय पक्ष आता आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागणार आहेत. मात्र, या निवडणुकीसाठी भाजप आणि काँग्रेसला अद्यापही पुण्यातून तुल्यबळ उमेदवार ठरविता आलेला नाही. येत्या एक-दोन महिन्यांत या दोन्ही राजकीय पक्षांमध्ये उमेदवार निवडीसाठी जोरदार हालचाली होतील.

संबंधित बातम्या :

भाजपमध्ये सर्व्हे, तसेच निवडून येण्याची क्षमता याला महत्त्व दिले जाते. त्यातच राज्यातील अस्थिर राजकीय वातावरण असल्याने भाजपला मित्रपक्षाशी संवाद साधत पुण्यातील उमेदवार ठरवावा लागेल. भाजपचा नवीन मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुण्यातील राजकीय स्थान लक्षात घेऊन, त्यांच्याशी संवाद साधत जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची निवड करण्याकडे भाजप श्रेष्ठींचा कल राहील, असा अंदाज आहे.

भाजपमध्ये पुण्यातील उमेदवार म्हणून प्रदेश सरचिटणीस व माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या नावाची चर्चा गेले काही महिने जोरात सुरू झाली आहे. त्यांनी निवडणूक लढविण्याची तयारीही सुरू केल्याचे दिसून येते. त्याचवेळी माजी आमदार जगदीश मुळीक यांनीही भाजपचे शहराध्यक्ष होते तेव्हापासून पुण्यातून लोकसभा निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली. या दोघांच्या जोडीला आता पक्षाचे राष्ट्रीय सचिव म्हणून काम केलेले आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जवळीक असलेले सुनील देवधर यांनीही भेटीगाठी घेत पुण्यातून उमेदवारी मिळविण्यासाठी कंबर कसली आहे. या तिघांव्यतिरिक्त अन्य काही नावांवरही चर्चा सुरू झाली आहे.

विरोधी पक्षाकडून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), शिवसेना (ठाकरे गट) आणि काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीचे जागा वाटप अद्याप झालेले नसले, तरी पुण्याची जागा काँग्रेसला मिळण्याची शक्यता आहे. उमेदवारीबाबत काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, कसबा पेठेचे आमदार रवींद्र धंगेकर, पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी आणि माजी शहराध्यक्ष अभय छाजेड यांच्या नावांची चर्चा सध्या सुरू आहे. या व्यतिरिक्त राज्य पातळीवरील किंवा पुण्यातील अन्य कोणी नेताही काँग्रेसकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता चर्चिली जात आहे.

देवेंद्र फडणवीस, पृथ्वीराज चव्हाण यांची नावे चर्चेत
पुण्यातून भाजपतर्फे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तर काँग्रेसतर्फे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावांची चर्चा त्या-त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांत सुरू झाली आहे. या दोन्ही नेत्यांनी पुण्यातून निवडणूक लढविण्यास नकार दिला आहे. मात्र, भाजपने तीन राज्यातील निवडणुकीत केंद्रीय पातळीवरील नेते व खासदार निवडणुकीच्या रिंगणात उतरविले होते. त्याच पद्धतीने राज्यातील नेते व वरिष्ठ आमदारांना या लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याची शक्यता आहे. त्यामुळे, फडणवीस यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. काँग्रेसकडून पृथ्वीराज चव्हाण यांनी गेल्या निवडणुकीत सातारा येथून लोकसभा लढविण्यास नकार दिला होता. या वेळी इंडिया आघाडीतर्फे मित्रपक्षांनी चव्हाण यांचे नाव पुण्यातून सुचविल्यास, काँग्रेसचे पक्षश्रेष्ठी त्यांच्याशी याबाबत चर्चा करण्याची शक्यता आहे. डिसेंबरमध्ये दिल्लीत याबाबत जोरदार खलबते होण्याची शक्यता आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news