भाजपचा नाशिकमध्ये विजयोत्सव ; तीन राज्यांतील यशामुळे पदाधिकारी-कार्यकर्त्यांचा जल्लोष | पुढारी

भाजपचा नाशिकमध्ये विजयोत्सव ; तीन राज्यांतील यशामुळे पदाधिकारी-कार्यकर्त्यांचा जल्लोष

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये भाजपला मिळालेल्या घवघवीत यशाबद्दल पक्षाच्या स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वसंतस्मृती कार्यालयाबाहेर विजयोत्सव साजरा केला. ढोल-ताशाच्या तालावर ठेका धरत एकमेकांना पेढे भरवून कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव व्यक्त केला.

देशातील पाच राज्यांपैकी चार राज्यांमधील विधानसभेच्या निवडणुकांचे निकाल रविवारी (दि. ३) घोषित झाले. आगामी लोकसभेची रंगीत तालीम असलेल्या या निवडणुकांच्या निकालात तेलंगणा वगळता उर्वरित तिन्ही राज्यांमधील स्थानिक जनतेने भाजपला स्पष्ट बहुमत दिले आहे. दरम्यान, निवडणुकांच्या मतमोजणीला सकाळी ८ पासून प्रारंभ झाला. यावेळी राजस्थान, मध्य प्रदेश तसेच छत्तीसगड या राज्यांमध्ये मतमोजणीमध्ये भाजपने सुरुवातीपासूनच घेतलेली आघाडी शेवटपर्यंत कायम राखली. तिन्ही राज्यांमध्ये मिळालेल्या दमदार यशाबद्दल स्थानिक पदाधिकाऱ्यांनी जल्लोष व्यक्त केला. याप्रसंगी कार्यकर्त्यांनी दिलेल्या ‘देश का नेता केसा हो, नरेंद्र मोदी जैसा हो’, ‘भारतीय जनता पक्षाचा विजय असो’ या घोषणांनी परिसर दणाणून गेला.

याप्रसंगी भाजपचे शहराध्यक्ष प्रशांत जाधव, प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी, आमदार सीमा हिरे, माजी महापाैर सतीश कुलकर्णी, ज्येष्ठ नेते विजय साने, माजी नगरसेवक शिवाजी गांगुर्डे, अजिंक्य साने, उद्धव निमसे, प्रवक्ते गोविंद बोरसे, रोहिणी नायडू, युवा शहराध्यक्ष अमित घुगे, महेश हिरे, माधुरी पालवे, शाहिन मिर्झा, श्याम बडोदे, धनंजय माने, अविनाश पाटील, स्मिता बोडके, सुमन विश्वकर्मा, सोनाली ठाकरे यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्तेे उपस्थित होते.

संबंधित बातम्या

भारतीय जनता पार्टी केंद्राच्या वतीने निवडणुकांच्या नियोजनाकरिता देश, महाराष्ट्र व नाशिकमधून कार्यकर्ते गेले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजातील शेवटच्या घटकाचा विचार करून योजना तयार केल्या. तसेच या योजनांच्या माध्यमातून शेवटच्या घटकापर्यंत केलेल्या उद्धाराचे हे फलित आहे. येत्या लोकसभा व महाराष्ट्र विधानसभेतही याच पद्धतीने निकाल हाती येतील.

– प्रशांत जाधव, शहराध्यक्ष, भाजप

 

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या महाविजयाची नांदी यशस्वी ठरली आहे. निवडणुकांच्या आडून महाराष्ट्रामध्ये खा. शरद पवार व खा. संजय राऊत यांनी आखलेले मनसुबे धुळीला मिळाले. महाराष्ट्रातील विजयाचा मार्गदेखील सुकर झाला आहे. इंडिया आघाडीची वज्र आणि मूठ एका फोटाेपुरती मर्यादित राहिली.

– लक्ष्मण सावजी, प्रदेश प्रवक्ते, भाजप

हेही वाचा :

Back to top button