Pune : विनापरवाना टपर्‍यांकडे डोळेझाक

Pune : विनापरवाना टपर्‍यांकडे डोळेझाक
Published on
Updated on

पौड रोड : पुढारी वृत्तसेवा :  सर्वसामान्य नागरिकांचे जनजीवन विस्कळीत होऊ नये, यासाठी न्यायालयाने बंधन घातले आहे. असे असताना पौड रोड परिसरात परवानगी नसताना रस्त्याच्या कडेला खाद्यपदार्थांच्या अनेक गाड्या उभ्या करण्यात येत आहेत. या गाड्यांना राजकीय नेत्यांचा वरदहस्त असल्याने प्रशासन बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप नागरिकांतून होत आहे. आयडियल बसथांबा, आनंदनगर बसथांबा, समर्थ हॉटेलजवळ, वनाज कॉर्नर, शिवतीर्थ नगर, कोथरूड डेपो, भुसारी कॉलनीचा मुख्य रस्ता अशा या पौड रोड परिसरात गल्लोगल्ली उघड्यावर अन्नपदार्थ शिजवले जातात. त्यासाठी लागणारा गॅस उघड्यावर वापरत असल्याचे दिसून येते. त्यामुळे दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण याकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे. पौड रोडवर सध्या वनाज ते रामवाडी मेट्रोचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. हे काम चालू असताना मुख्य रस्त्याची रुंदी काही प्रमाणात कमी झाली आहे. त्यामुळे वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. त्याचप्रमाणे पदपथावर खाद्यपदार्थ विक्री करणार्‍या व्यावसायिकांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे पादचार्‍यांचीदेखील गैरसोय होत आहे.

संबंधित बातम्या :

पदपथावर खाद्यपदार्थ विक्री करणार्‍या व्यावसायिकांवर कारवाई का करण्यात येत नाही, असा सवाल उपस्थित होत आहे. रस्त्याकडेला लावण्यात आलेल्या गाड्यांभोवती नागरिक आपली वाहने उभी करत असल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. गर्दीमुळे वाहतुकीस अडथळे निर्माण होत आहेत. खाद्यपदार्थांच्या गाड्यांकडे कोथरूड क्षेत्रीय कार्यालयाकडून डोळेझाक केल्याचे दिसून येत आहे. रस्त्यावर खाद्यपदार्थ विक्री करण्यात येत असूनही, खाद्यपदार्थ तपासणी करीत कोथरूड क्षेत्रीय कार्यालयाकडे कोणतेही अधिकार नसून, राज्य शासनाच्या सूचनेनुसार खाद्यपदार्थ तपासणीचे अधिकार अन्न आणि औषध प्रशासनाला असल्याचे क्षेत्रीय कार्यालयातील वरिष्ठ आरोग्य अधीक्षक राम सोनवणे यांनी सांगितले.

पौड रोडवर वाहतुकीची वर्दळ असलेल्या आय. डी. एल. बस थांबा तसेच वनाज कॉर्नरजवळ दिवसाढवळ्या खाद्यपदार्थांची गाडी लावण्यात येत असूनही कारवाई न करण्यासाठी विक्रेत्यांच्या पाठीवर राजकीय आशीर्वाद असल्याची चर्चा पौड रोड भागामध्ये आहे. दरम्यान, खाद्यपदार्थाची विनापरवाना गाडी लावणार्‍यांवर कोथरूड क्षेत्रीय कार्यालय आणि अन्न व औषध प्रशासन विभाग कधी कारवाई करणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

अनेकदा घरगुती गॅस मिळत नाही

पौड रोड परिसरात सामान्य नागरिकांना घरगुती गॅस अनेकदा बुकिंग करूनही वेळेवर मिळत नाही. वस्ती भागातल्या नागरिकांना सकाळी लवकर गॅस सिलिंडर घेण्यासाठी लाइनमध्ये उभे राहावे लागते. पण या भागात हॉटेल व्यावसायिक, टपरीचालक आणि मोठे व्यावसायिक यांच्या 'अर्थ'पूर्ण मैत्रीमुळे त्यांना केव्हाही आणि कधीही गॅस सिलिंडर मिळतो, असा आरोप नागरिकांनी केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news