पुढारी ऑनलाईन डेस्क : आपल्या विनोदाच्या अचूक टायमिंगने प्रेक्षकांना मनमुराद हसवणाऱ्या अभिनेता भाऊ कदम यांचा चाहता वर्ग मोठा आहे. आपल्या आवडत्या कलाकाराची भेट व्हावी असं प्रत्येक प्रेक्षकांना वाटत असतंच. पण भाऊ कदम यांच्या दर्शनासाठी लोकांच्या लांब रांगा लागतायेत हे ऐकून तुम्हीसुद्धा दचकला असाल ना! त्यांचं दर्शन मिळावं यासाठी झुंबड उडतेय. विश्वास बसत नाही ना! मग 'एकदा येऊन तर बघा'.
संबंधित बातम्या –
८ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या 'एकदा येऊन तर बघा' या आगामी चित्रपटात भाऊ कदम एका खास भूमिकेत दिसणार आहेत. 'बाबा गुलाबी गरम' ही व्यक्तिरेखा ते यात साकारणार आहेत. अडचणीत असलेल्या भक्तांना मार्गदर्शन देणारे 'बाबा गुलाबी गरम' यांची लीला चित्रपटात पाहाण्याची गंमत वेगळी आहे. लेखक-दिग्दर्शक प्रसाद खांडेकर या चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शकीय पदार्पण करीत आहे.
आपल्या भूमिकेविषयी भाऊ म्हणाला, 'खूप मजेशीर अशी ही व्यक्तिरेखा आहे. हा 'बाबा गुलाबी गरम' प्रेक्षकांचं नक्कीच मनोरंजन करेल. भाऊ कदम यांच्यासोबत गिरीश कुलकर्णी, सयाजी शिंदे तेजस्विनी पंडित, पॅडी कांबळे, ओंकार भोजने, प्रसाद खांडेकर, विशाखा सुभेदार, राजेंद्र शिसातकर, नम्रता संभेराव, वनिता खरात, शशिकांत केरकर, रोहित माने, सुशील इनामदार असे एक सो एक विनोदवीर या चित्रपटात आहेत.
चित्रपटाची निर्मिती परितोष पेंटर, राजेशकुमार मोहंती, दीपक क्रिशन चौधरी, सेजल दिपक पेंटर यांची आहे. सहनिर्मिती अश्विन पद्मनाभन, सत्यनारायण मूरथी, डॉ. झारा खादर यांची आहे. कथा परितोष पेंटर यांची असून पटकथा, संवाद प्रसाद खांडेकर यांचे आहेत. छायांकन योगेश कोळी तर संकलन निलेश गावंड यांचे आहे. मनोज अवना आणि कृपाल सिंग कार्यकारी निर्माते आहेत.