पुणे : पुढारी वृत्तसेवा : कुष्ठरोग व क्षयरोगाच्या जनजागृतीसाठी जिल्ह्यात 20 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर या कालावधीत रुग्ण शोधमोहीम राबविण्यात येणार असून, आरोग्य विभागाने जिल्ह्यात हे अभियान प्रभावीपणे राबवून यशस्वी करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. या वेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. संजय दराडे, पुणे महानगरपालिकेचे वैद्यकिय अधिकारी डॉ. इरफान लोहारे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. अंजली ढोणे, जिल्हा क्षयरोग केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जयंत काळकुटे, जि. प. उपशिक्षणाधिकारी मोमीन अस्माबेगन मोहम्म्द इमादोद्दीन आदी उपस्थित होते.
संबंधित बातम्या :
देशमुख म्हणाले, या अभियानात आरोग्य विभागाने चांगल्याप्रकारे नियोजन करून जिल्ह्यातील प्रत्येक घरात कुष्ठरोग व क्षयरुग्णांचे सर्वेक्षण करावे. गट शिक्षण अधिकारी, केंद्रप्रमुख व मुख्याद्यापक यांना निर्देश देऊन प्रत्येक शाळेत जनजागृतीची शिबिरे घ्यावीत. शाळेतील विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीबरोबरच विद्यार्थ्यांच्या माध्यमातून घरातील सदस्यांची कुष्ठरोग व क्षयरुणांची माहितीची पत्रके भरून घ्यावीत. अभियानात विविध यंत्रणांचा सहभाग घ्यावा.
पुणे जिल्ह्यात नोव्हेंबर 2023 अखेर 632 कुष्ठरुग्ण असून, त्यांच्यावर औषधोपचार केले जात आहेत. कुष्ठरोग दर हा प्रति दहा हजार लोकसंख्येत 0.60 इतका आहे. एप्रिल 2023 ते नोव्हेंबर 2023 अखेर 318 इतके नवीन कुष्ठरुग्ण शोधण्यात आले. तसेच जानेवारी 2023 ते नोव्हेंबर अखेर 6 हजार 132 क्षयरुग्ण आढळले असून, त्यांच्यावरही औषधोपचार केले जात आहेत.
असे आहे संयुक्त अभियान
आशा कार्यकर्त्या व पुरुष स्वयंसेवकांचे पथक तसेच आरोग्य कर्मचारी घरोघरी जाऊन क्षयरोग व कुष्ठरोगाच्या लक्षणांची तपासणी करण्यासह माहिती घेणार आहेत. राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नवीन रुग्ण रोगाच्या सुरुवातीच्या टप्प्यातच ओळखून उपचार केले जात आहेत.