पुणे विभागातील सव्वा दोन लाख नागरिक तहानलेले ; 110 गावांत टँकरने पाणी | पुढारी

पुणे विभागातील सव्वा दोन लाख नागरिक तहानलेले ; 110 गावांत टँकरने पाणी

समीर सय्यद

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुणे विभागात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ती भविष्यात तीव्र होण्याची शक्यता आहे. विभागातील 110 गावे आणि 635 वाड्यांमध्ये पाणीटंचाई जाणवत असून, दोन लाख 11 हजार 443 नागरिक आणि 88 हजार जनावरांना 113 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. टंचाई असलेल्या भागात मागणी झाल्यानंतर लगेच टँकर सुरू केले जात आहेत, त्यासाठी टँकर सुरू करण्याचे अधिकार उपविभागीय अधिकार्‍यांना देण्यात आले आहेत. यंदा मान्सून विलंबाने सक्रिय झाला. जूनच्या शेवटच्या आठवड्यात दमदार हजेरी लावणार्‍या पावसाने जुलै महिन्यात दडी मारली.

संबंधित बातम्या :

त्यानंतर झालेल्या पावसामुळे कृष्णा आणि भीमा खोर्‍यातील धरणांमध्ये चांगला पाणीसाठा जमा झाला. त्यामुळे पुणे विभाग टँकरमुक्त होईल, अशी शक्यता होती. मात्र, तसे झाले नाही. आतापर्यंत केवळ उन्हाळ्यात टँकरने पाणीपुरवठा करावा लागत असे. परंतु, यंदा पावसाच्या लहरीपणामुळे उन्हाळ्यापेक्षा पावसाळ्यात टँकरची संख्या वाढली होती. आता हिवाळ्यातही सुरू असलेल्या टँकरची संख्या 113 आहे. त्यामुळे हिवाळ्यानंतर उन्हाळ्यात पाणीटंचाई अधीक तीव्र होण्याची शक्यता आहे.

पुणे विभागातील कोल्हापूर जिल्हा वगळता उर्वरित चारही जिल्ह्यात टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. त्यात सर्वाधिक सातारा जिल्ह्यातील 64 गावे आणि 268 वाड्यांमध्ये पाणीटंचाई असून, येथील 73 हजार जनावरे आणि 95 हजार नागरिकांना 64 टँकरच्या मदतीने पाणी पुरविले जात आहे. सांगली जिल्ह्यात 33 गावे आणि 271 वाड्या तहानलेल्या आहेत. येथील चार हजार जनावरे आणि 83 हजार नागरिकांना 33 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. पुणे जिल्ह्यात तुलनेत टँकरची संख्येत घट झाली असून, सध्या 12 टँकरद्वारे 10 गावे आणि 61 वाड्यांतील 22 हजार नागरिकांना पाणीपुरवठा केला जात आहे.

टँकर लॉबीचे चांगभले
पुणे विभागात 113 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. यामध्ये 26 टँकर हे शासकीय असून, उर्वरित 87 टँकर हे खासगी आहेत. त्यामुळे टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यातून टँकर लॉबीचे चांगभले होत असल्याचे दिसून येत आहे. सातारा जिल्ह्यात 52, सांगलीमध्ये 28, पुणे 3 आणि सोलापूर जिल्ह्यात चारही टँकर खासगी आहेत.

Back to top button