पुणे : गावठाणातील जुन्या वाड्यांच्या विकसनाचा मार्ग मोकळा | पुढारी

पुणे : गावठाणातील जुन्या वाड्यांच्या विकसनाचा मार्ग मोकळा

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  शहरातील गावठाण हद्दीतील सहा मीटर रस्त्याच्या कडेच्या आणि एक हजार चौरस मीटरपेक्षा कमी क्षेत्रफळ असलेल्या मिळकतींना हार्डशिप भरून साईड मार्जिनमध्ये सवलत देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. यामुळे साईड मार्जिनच्या अटीमुळे अडलेल्या जुन्या गावठाणांतील वाड्यांच्या विकसनाचा मार्ग मोकळा झाला आहे. शहरातील मध्यवर्ती पेठा प्रामुख्याने गावठाणांमध्ये जुनी घरे आणि वाडे दाट वस्तीत आहेत. विकास नियंत्रण नियमावलीतील नियमांमुळे जुन्या वाड्यांचा पुनर्विकास खुंटला होता. प्रामुख्याने वाड्यांचे कमी असलेले क्षेत्रफळ, भाडेकरूंची संख्या, रस्त्यानुसार इमारतीच्या रुंदीची मर्यादा आणि एक मीटरच्या साईड मार्जिनच्या अटीमुळे पुनर्विकासाला खीळ बसली होती.

संबंधित बातम्या :

त्यामुळे साईड मार्जिनच्या नियमावलीत शिथिलता आणावी, अशी मागणी महापालिकेकडे होत होती. महापालिकेने यासंदर्भात राज्य शासनाकडून अभिप्राय मागविला होता. त्यावर शासनाने हार्डशिप प्रीमियम आकारून तसेच जागेवरची स्थिती पाहून महापालिका आयुक्तांना बांधकाम परवानगी देण्याचा अधिकार असल्याचे स्पष्ट केले होते.

त्यानुसार महापालिका आयुक्तांनी तीन महिन्यांपूर्वी 18 मीटर रुंदीपर्यंतच्या इमारतींना हार्डशिप प्रीमियम आकारून साईड मार्जिनमध्ये शिथिलता आणून बांधकाम परवानगी देण्याचे निर्देश दिले होते; परंतु यामध्ये संबधित मिळकतींच्या लगतच्या रस्त्यांची लांबी नमूद केलेली नव्हती. परंतु, 18 मीटरपेक्षा जास्त रुंदीच्या मिळकतींना ही सवलत नसल्याने अनेक वाडेधारक आणि प्रामुख्याने विकसकांनी यावर नाराजी व्यक्त केली होती. त्यावर अखेर आयुक्त विक्रम कुमार यांनी 18 मीटरपर्यंत व त्यापुढील रुंदीच्या मिळकतींनाही हार्डशिप प्रीमियम आकारून साईड मार्जिनमध्ये शिथिलता देण्याचे आदेश काढले आहेत.

त्यानुसार 18 मीटर पुढील मिळकतींना दोन टक्के अतिरिक्त हार्डशिप प्रीमियम आकारून ही परवानगी देण्याचे आदेश देतानाच 6 मीटर रुंद रस्त्यापुढील मिळकतींना याचा लाभ घेता येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. या निर्णयामुळे गावठाणांतील जुनी घरे आणि वाड्यांच्या पुनर्विकासाला गती मिळू शकणार आहे.

महापालिका आयुक्तांच्या अधिकारात 18 मीटरपेक्षा अधिक रुंदीच्या वाड्यांचा पुनर्विकास करताना 2 टक्के अतिरिक्त प्रीमियम हार्डशिप आकारून साईड मार्जिनमध्ये सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे वाड्यांचा पुनर्विकास गतीने होईल तसेच नागरिकांना अग्निशमन, पार्किंगसह अन्य सुविधा उपलब्ध करून देण्यात मदत होईल.
                                                                   – प्रशांत वाघमारे, शहर अभियंता,

Back to top button