कोल्हापूर : जरांगे-पाटील यांची तोफ आज दसरा चौकात धडाडणार

Maratha Reaservation
Maratha Reaservation
Published on
Updated on

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा मराठा आरक्षणासाठी मैदानात उतरलेले मनोज जरांगे-पाटील यांची तोफ शुक्रवारी (दि. 17) दुपारी 3 वाजता ऐतिहासिक दसरा चौक येथील जाहीर सभेत धडाडणार आहे. सभेची जय्यत तयारी करण्यात आल्याची माहिती सकल मराठा समाजाचे समन्वयक वसंतराव मुळीक यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.

मुळीक म्हणाले, सभेसाठी शाहू महाराज यांना निमंत्रित केले आहे. व्यासपीठावर बसण्यापेक्षा जरांगे-पाटील यांचे भाषण ऐकणे माझ्यासाठी महत्त्वाचे असल्याची शाहू महाराज यांची भूमिका आहे. मात्र, लोकभावनेचा आदर करून शाहू महाराज यांना व्यासपीठावर बसण्याची विनंती करणार आहे. आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज यांच्या समतेच्या नगरीत होणारी ही सभा मराठा आरक्षणाला बळ देणारी व्हावी, यासाठी जिल्ह्यात प्रभावी यंत्रणा राबविली आहे. प्रशासन आणि सकल मराठा समाज यांच्या समन्वयातून सभेचे नेटके नियोजन करण्यात आले असल्याचेही मुळीक यांनी सांगितले.

सांगलीहून तावडे हॉटेलमार्गे जरांगे-पाटील हे कोल्हापुरात येणार आहेत. तावडे हॉटेल, ताराराणी चौक, सिंचन भवन चौक, जिल्हाधिकारी कार्यालय, खानविलकर पेट्रोल पंप, सीपीआर चौकातून राजर्षी शाहू महाराज यांच्या समाधी स्मारकस्थळावर जाऊन जरांगे-पाटील अभिवादन करणार आहेत. त्यानंतर ते दसरा चौकातील सभास्थळी येतील, असे सांगून मुळीक म्हणाले, या सभेला जिल्ह्यातून सुमारे दोन लाख मराठा बांधव उपस्थित राहणार असून, कोल्हापूरच्या परंपरेला शोभेल अशी ही भव्य सभा होणार आहे.

राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्याखाली सुसज्ज मंच उभारण्यात आला आहे. व्हिनस कॉर्नर, अयोध्या टॉकीज, खानविलकर पेट्रोल पंप येथून सुमारे एक किलोमीटरपर्यंत सभेचा आवाज पोहोचेल, अशी ध्वनी व्यवस्था केली आहे. याबरोबरच विविध 11 ठिकाणी मोठ्या स्क्रीनची सोय केली आहे. यामध्ये प्रामुख्याने दसरा चौक, सीपीआर चौक, अयोध्या टॉकीज, शहाजी कॉलेज, टायटन शोरूम, नोव्हेल शोरूम आदी ठिकाणांचा समावेश आहे.

समाज बांधवांनी सोबत भगवे झेंडे, कडक उन्हाळा लक्षात घेता भगवी टोपी, नॅपकिन तसेच पाण्याची बाटली आणावी, असे आवाहन करून मुळीक म्हणाले, सभा संपल्यानंतर सभास्थळासह संपूर्ण परिसराची स्वच्छता केली जाणार आहे. वाहनांची पार्किंग व्यवस्था पोलिस प्रशासन व सकल मराठा कमिटीने ठिकठिकाणी निश्चित केली आहे. पाच हजार चारचाकी आणि चार हजार दुचाकी पार्किंग होईल, अशी व्यवस्था असणार आहे.

पत्रकार परिषदेस अ‍ॅड. बाबा इंदुलकर, दिलीप देसाई, बाबा पार्टे, आर. के. पोवार, राजेंद्र लिंग्रस, चंद्रकांत पाटील, उदय लाड, बाजीराव नाईक, अमर निंबाळकर, कमलाकर जगदाळे, संजय देसाई यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news