दमदार परताव्याचे सोने | पुढारी

दमदार परताव्याचे सोने

संतोष घारे, अर्थतज्ज्ञ

भारतात प्राचीन काळापासून सोन्याच्या खरेदीला गुंतवणुकीचे उत्तम माध्यम मानले गेले आहे. विशेष म्हणजे अस्थिरतेच्या काळात सोन्याने नेहमीच चांगला परतावा दिला आहे. यावर्षी सप्टेंबर महिन्याअखेरपर्यंत सोन्याने गुंतवणूकदारांना 10.6 टक्के परतावा दिला आहे. त्याचवेळी वर्षात सोन्याने 20 टक्क्यांपर्यंत परतावा दिल्याचे सांगितले जात आहे.

व्याजदर वाढ आणि बाँडच्या परताव्यात चांगली वाढ झालेली असली तरी 2023 मध्ये सोन्याने चमकदार कामगिरी केली आणि ती आणखी चमकत आहे. यावर्षी सप्टेंबर महिन्याअखेरपर्यंत सोन्याने गुंतवणूकदारांना 10.6 टक्के परतावा दिला आहे. त्याचवेळी एक वर्षात सोन्याने 20 टक्क्यांपर्यंत परतावा दिल्याचे सांगितले जात आहे. एकीकडे हमास आणि इस्रायल युद्ध सुरू असल्याने पश्चिम आशियात तणाव वाढला आहे, तर दुसरीकडे रशिया आणि युक्रेन यांच्यात दीर्घकाळापासून लढाई सुरू असल्याने जागतिक वातावरणात तणाव आहे. भू-राजनैतिक संकटाच्या कारणांमुळे जागतिक पातळीवर महागाईने कळस गाठला आहे. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी आता फेडरल रिझर्व्ह बँक व्याज दरात वाढ करण्याचे शस्त्र वापरत आहे. येत्या काळात फेड रिझर्व्हकडून व्याज दरात कपात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसे झाल्यास अन्य देशदेखील फेडरल रिझर्व्ह बँकेच्या पावलावर पाऊल टाकत वाटचाल करतील. त्यामुळे कर्ज आणि ठेवी या दोन्हींवरील व्याज दरात कपात राहू शकते. अशा वेळी व्याज दरात घट होईल तेव्हा चांगल्या परताव्यासाठी नागरिक सोन्यात गुंतवणूक करतील.

भू-राजकीय संकट आणि महागाई या कारणांमुळे डॉलरच्या निर्देशांकात घट झाली आहे. परिणामी सोन्याच्या मागणीत तेजी राहण्याचा अंदाज आहे कारण डॉलरच्या किमतीत घट झाल्याने नागरिकांना सोने हा गुंतवणुकीचा चांगला पर्याय वाटू शकतो. जगात सर्व केंद्रीय बँका या कमी-अधिक प्रमाणात सोन्यात गुंतवणूक करत असतात. आरबीआयने 2022 च्या सप्टेंबरच्या तिमाहीत 158.6 टन सोने खरेदी केले तर 2022 च्या डिसेंबर तिमाहीत 458.8 टन सोने खरेदी केले. त्याचवेळी 2023 च्या मार्च, जून आणि सप्टेंबर या तिमाहीत अनुक्रमे 381.8 टन, 284 टन आणि 103 टन सोने खरेदी केले. त्याचवेळी जगातील काही देशांच्या केंद्रीय बँकांनी कॅलेंडर वर्ष 2022 मध्ये 11.36 टनापेक्षा अधिक सोने खरेदी केले. ही खरेदी कोणत्याही कॅलेंडर वर्षाच्या तुलनेत अधिक आहे. यावर्षीदेखील केंद्रीय बँक भांडवल वाढविण्यासाठी सोन्याची खरेदी करू शकते. जेव्हा सोन्याची खरेदी वाढेल, तेव्हा त्याच्या किमतीतदेखील वाढ होईल.

जून 2008 मध्ये दहा ग्रॅम सोन्याची किंमत 11,901 रुपये होती; तर जून 2014 मध्ये दहा ग्रॅम सोन्याची किंमत 25,926 रुपये. त्याचवेळी जून 2017 मध्ये दहा ग्रॅमचे सोने 29,499 रुपये होते. ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याच्या किमतीत अभूतपूर्व वाढ झाली आणि ते 56,499 रुपयांवर पोहोचले. आता ऑक्टोबर महिन्यात त्याची किंमत 60.382 रुपयांवर पोहोचली आहे. त्यात जीएसटी जोडल्यास किंमत 62,193 रुपये होते. गेल्या दहा वर्षांत सोन्याच्या किमतीतून 105 टक्के परतावा मिळाला तर जागतिक बाजारात सोन्याच्या किमतीत 63 टक्के वाढ झाली आहे. तज्ज्ञांच्या मते, 2024 च्या अखेरपर्यंत दहा ग्रॅम सोने 70 हजारांपर्यंत जाऊ शकते.

गेल्या वर्षीच्या दसर्‍याच्या तुलनेत यावर्षी सोन्याच्या विक्रीत 30 टक्के वाढ झाली आहे. आता दिवाळी सुरू झाली असून, सोने आणखी चमकत आहे. अर्थात, उत्सवाचे दिवस संपले तरीही सोन्याची चमक कायम राहणार आहे कारण डिसेंबर महिन्यात विवाहाचा हंगाम सुरू होत आहे. लग्न समारंभासाठी नागरिक आपल्या आर्थिक कुवतीनुसार कमी-अधिक प्रमाणात सोन्याची खरेदी करत असतात. तसेच अर्थव्यवस्थेचा वेग मंदावण्याचे चिन्हे दिसू लागताच गुंतवणूकदार सोन्याकडे वळतात. कारण अन्य गुंतवणुकीतून परतावा कमी राहण्याची शक्यता असते आणि ही गुंतवणूक सुरक्षितही नसते. भारत मात्र याला अपवाद आहे कारण नागरिक मंदी नसतानाही सोन्यात गुंतवणूक करतात. भारतात प्राचीन काळापासून सोन्याच्या खरेदीला गुंतवणुकीचे उत्तम माध्यम मानले गेले आहे. सोन्याच्या किमतीत पन्नास वर्षांतील चढ-उतार पाहिला, तर त्याच्या किमतीत होणारा बदल हा चार-पाच वर्षांपर्यंत चालतो. त्यामुळे आगामी काळात सोन्याची किंमत ही उच्चांकी पातळीवर राहू शकते, असा अंदाज आहे.

भारतात सोने हे नेहमीच सोने राहिले आहे कारण भारतातील महिलांचे सोन्यावर प्रचंड प्रेम असते. हे प्रेम हजारो वर्षांपासून आहे. प्राचीन काळात तर महिलांसमवेत पुरुषही सोने घालत असत. मे 2022 मध्ये हडप्पा येथे केलेल्या उत्खननात सोन्याचे कडे, बाळी आदी दागिने मिळाले आणि हे दागिने प्रामुख्याने पुरुष घालत असत. शिवाय महिलांच्या बांगड्या, अंगठ्या, झुमके आदी देखील सापडले आहेत. यानुसार भारतीय संस्कृतीत, जीवनशैलीत सोने हा अविभाज्य भाग राहिला आहे आणि त्याच्याशिवाय आयुष्याची कल्पनाच करता येणार नाही. भारतीय महिलांसाठी सोने केवळ हे दागिनेच नाही, तर सौभाग्यवती असण्याचे, स्वाभिमानाचे आणि गौरवाचे प्रतीक आहे. हिंदू धर्मातील 16 संस्कारांत अर्थात जन्मापासून मृत्यूपर्यंत सोन्याचा वापर केला गेला आहे.

दक्षिण भारतीय राज्यांत देशाच्या एकूण खरेदीत 40 टक्के वाटा आहे. त्यात एकट्या तामिळनाडूत सोन्यातील उलाढाल 28 टक्के आहे. भारतीय मंदिरांतदेखील प्रचंड सोने आहे. याबाबत डब्ल्यूजीसी-2020 च्या अहवालात म्हटले की, चार हजार टनापेक्षा अधिक सोने मंदिरात आहे. उदा. केरळच्या पद्मनाभ मंदिराचे घ्या. तेथे 1300 टन सोने आहे. आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी मंदिरात सुमारे 300 टन सोने आहे. आजच्या काळात सोन्याची मागणी पूर्ण करण्यासाठी स्वित्झर्लंडहून 45.8 टक्के, यूएईमधून 12.7 टक्के, दक्षिण आफ्रिका आणि गिनीतून 7.3 टक्के आणि पेरूतून 5 टक्के सोन्याची आयात केली जाते. सोन्याच्या खरेदीत भारताचा क्रमांक हा चीननंतर लागतो. चीन पहिल्या स्थानावर आहे.

सध्या वाढती महागाई, कर्जाचे व्याजदर आणि भू-राजनैतिक संकट, जागतिक मंदीची शक्यता आदी कारणांमुळे नागरिक अन्य गुंतवणुकीकडे जाण्यास तयार नाहीत. त्यांना गुंतवणुकीसाठी सोने जवळचे वाटत आहे. सोन्यात गुंतवणूक केल्याने पैसे सुरक्षित राहतीलच, अशी अपेक्षा आहे.

Back to top button