Assembly Elections 2023 | मध्य प्रदेशात २३० जागांसाठी तर छत्तीसगडमध्ये दुसऱ्या टप्प्यातील ७० जागांसाठी मतदान सुरु | पुढारी

Assembly Elections 2023 | मध्य प्रदेशात २३० जागांसाठी तर छत्तीसगडमध्ये दुसऱ्या टप्प्यातील ७० जागांसाठी मतदान सुरु

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय निवडणूक आयोगाकडून देशातील मध्य प्रदेश, छत्तीसगड, मिझोराम, राजस्थान आणि तेलंगणा या पाच राज्यांतील विधानसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला. यानुसार आज (दि.१७) मध्य प्रदेश आणि छत्तीसगढमध्ये दुसऱ्या टप्प्यात मतदान होत आहेत. मध्य प्रदेशात भाजपचे सरकार असून, येथे गड राखण्याचे आव्हान भाजपसमोर आहे. तर छत्तीसगडमध्ये काँग्रेसची सत्ता असून, काँग्रेससमोर सत्ता कायम ठेवण्याचे तर भाजपसमोर सत्ता परिवर्तनाचे आव्हान असणार आहे. मध्य प्रदेशात २३० तर छत्तीसगडमध्ये दुसऱ्या टप्प्यात ७० जागांसाठी मतदानाला आज (दि.१७) सकाळी सुरुवात झाली. यापूर्वी छत्तीसगडमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान मंगळवारी ७ नोव्हेबर रोजी पार पडले. (Assembly Elections 2023)

मध्य प्रदेशातील २३० जागांसाठी एकूण २,५३३ उमेदवार रिंगणात आहेत. राज्यात सत्ताधारी भाजप आणि विरोधी काँग्रेसमध्येच प्रमुख लढत आहे.

आयोगाकडून पाच राज्यांतील ६७९ विधानसभा जागांसाठी निवडणुक कार्यक्रम जाहीर करण्यात आला. यानुसार राजस्थान आणि छत्तीसगडमधील दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज (१७ नोव्हेंबर) होणार आहे. मिझोराम, छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान आणि तेलंगणा या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुक जाहीर झाल्या आहेत. या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांना २०२४ च्या लोकसभा निवडणुकीची सेमीफायनल म्हटले जात आहे. या राज्यात काँग्रेससह २० हून अधिक विरोधी पक्ष I.N.D.I.A.च्या बॅनरखाली एकत्र लढत आहेत. मध्य प्रदेशात २३०, राजस्थानमध्ये २००, तेलंगणा ११९, छत्तीसगड ९० तर मिझोराममध्ये ४० विधानसभा जागांसाठी या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. (Assembly Elections 2023)

छत्तीसगड, राजस्थानमध्ये काँग्रेसची सरकारे

मिझोराम विधानसभेचा कार्यकाळ या वर्षी १७ डिसेंबर रोजी संपत आहे. तिथे मिझो नॅशनल फ्रंटची सत्ता आहे. तेलंगणा, राजस्थान, छत्तीसगड आणि राजस्थानच्या विधानसभांचा कार्यकाळ पुढील वर्षी जानेवारीमध्ये वेगवेगळ्या तारखांना संपत आहे. तेलंगणात भारत राष्ट्र समिती (BRS) तर मध्य प्रदेशात भाजपची सत्ता आहे. तर छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये काँग्रेसची सरकारे आहेत. (Assembly Elections 2023)

Assembly Elections 2023 : मध्य प्रदेशात भाजपसमोर गड राखण्याचे आव्हान

मध्य प्रदेशसह ५ राज्यातील निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला. आयोगाने जाहीर केलेल्या तारखांनुसार, मध्य प्रदेशात आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. मध्य प्रदेशात गेल्या पाच वर्षांत दोन सरकारे आली आहेत. २०१८ च्या निवडणुकीच्या निकालानंतर १५ वर्षांनी राज्यात काँग्रेसने सरकार स्थापन केले. कमलनाथ राज्याचे मुख्यमंत्री झाले. मात्र, राज्यातील कमलनाथ सरकार केवळ १५ महिनेच टिकू शकले. १५ महिन्यांनंतर भाजप पुन्हा एकदा राज्यात सत्तेत आले. (Assembly Elections 2023)

सुरूवातीला काँग्रेसचे…मात्र राजकीय नाट्यानंतर भाजपची सत्ता

२३० सदस्यांच्या विधानसभेत काँग्रेसला बहुमतापेक्षा दोन कमी म्हणजे ११४ जागा मिळाल्या होत्या. त्याचवेळी भाजपला १०९ जागा मिळाल्या होत्या. बसपाला दोन तर इतरांना पाच जागा मिळाल्या होत्या. निकालानंतर काँग्रेसने बसपा, सपा आणि इतरांना सोबत घेऊन सरकार स्थापन केले. १५ वर्षांनंतर राज्यात काँग्रेसच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले आणि कमलनाथ मुख्यमंत्री झाले. मात्र निवडणुकीनंतर दोन वर्षांनी मोठे राजकीय नाट्य घडले. फ्लोअर टेस्टपूर्वी कमलनाथ यांनी राजीनामा दिला. २२ बंडखोरांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर २३ मार्च २०२० रोजी शिवराज सिंह चौहान यांनी नवीन मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. सध्या मध्य प्रदेशमध्ये भाजपचे १२७, काँग्रेसचे ९६ आमदार आहेत.

छत्तीसगडमध्ये मतदानाचा दुसरा टप्पा; ९० जागांवर लढत

छत्तीसगडमध्ये विधानसभेच्या एकूण ९० जागा आहेत. यासाठी मतदानाचा पहिला टप्पा मंगळवारी ७ नोव्हेबर रोजी पार पडला. तर दुसरा टप्पा आज १७ नोव्हेंबर रोजी पार पडत आहे. राज्यात भाजप आणि काँग्रेसमध्ये थेट लढत होणार आहे. राज्यात काँग्रेस पुन्हा एकदा सरकार स्थापन करण्याच्या प्रयत्नात आहे. त्याचबरोबर भाजप सत्ता परिवर्तनासाठी सज्ज झाली आहे. २०१८ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने ७१ जागा जिंकून राज्यात प्रथमच सरकार स्थापन केले. त्याचवेळी भाजपला केवळ १३ जागांवर समाधान मानावे लागले. याशिवाय बसपने २ तर जनता काँग्रेसने ३ जागा जिंकल्या होत्या.

हेही वाचा:

Back to top button