Maratha Reservation : कुणबी नोंदी शोधण्यासाठी 70 भाषावाचक | पुढारी

Maratha Reservation : कुणबी नोंदी शोधण्यासाठी 70 भाषावाचक

पुणे : पुढारी वृत्तसेवा : मराठा कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्रासाठी शिंदे समितीच्या अहवालानुसार 1969 पूर्वीच्या कुणबी नोंदी शोधल्या जात आहेत. या नोंदी शोधण्यासाठी पुराभिलेख संचालनालयाकडून मोडी भाषेचे शिक्षण घेऊन उत्तीर्ण झालेल्या 70 भाषावाचकांची यादी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाली आहे. राज्य शासनाच्या निर्देशानुसार मराठा कुणबी, कुणबी मराठा नोंदी शोधण्याचे काम सरकारी पातळीवर सुरू झाले आहे.

त्या संदर्भात शिंदे समितीने दिलेल्या 13 कागदपत्रांच्या आधारानुसार जात प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेमध्ये आवश्यक व अनिवार्य निजामकालीन पुरावे, वंशावळी, शैक्षणिक पुरावे, महसुली पुरावे, निजामकाळात झालेले करार, निजामकालीन संस्थानिकांनी दिलेल्या सनदा, राष्ट्रीय दस्तऐवज इत्यादी पुराव्यांची वैधानिक तपासणी करण्यात येत आहे. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात कुणबी नोंदणी तपासणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात तिसर्‍या मजल्यावर सर्वसाधारण शाखेत स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

प्रांत आणि तहसील पातळीवर अशा नोंदी सापडल्यास स्थानिक पातळीवर यादीनुसार जी व्यक्ती जवळ आहे, त्या भाषा जाणकारास संपर्क साधून मजकुराचे भाषांतर करून घ्यावयाचे आहे. इतर व्यक्तींकडून भाषांतर केल्यास त्याला मान्यता मिळणार नसून, पुराभिलेख खात्याकडून प्राप्त यादीतील भाषाकारानेच केलेले भाषांतर अधिकृत धरले जाणार आहे.

सुयोग बेंद्रे, कक्ष अधिकारी, कुणबी नोंदणी तपासणी कक्ष

हेही वाचा

Back to top button