पुणे : पुढारी वृत्तसेवा : शासनाची कोणतीही परवानगी न घेता राजरोसपणे शाळा सुरू करून शासनाची व विद्यार्थ्यांची फसवणूक करणार्या हवेली तालुक्यातील 15 शाळांची यादी गटशिक्षणाधिकारी नीलिमा म्हेत्रे यांनी प्रसिद्ध केली आहे. त्यात नामांकित शाळांचा समावेश असून, या शाळांनी शिक्षण हक्क कायदा व स्वयंअर्थसाहित कायद्याचे उल्लंघन केले असल्याचा ठपका शिक्षण विभागाने ठेवला आहे. शिक्षण विभागातर्फे राज्यातील सर्व अनधिकृत शाळांवर कारवाई करण्याची मोहीम गेल्या वर्षभरापासून सुरू आहे.
त्यात काही शाळांवर कारवाई करून या शाळा बंद केल्या. परंतु, काही शाळा अजूनही शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवत बेकायदेशीरपणे सुरू आहेत. पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अनधिकृत शाळांची तपासणी करण्यात आली. त्यातील काही शाळांना जिल्हा परिषदेचे विस्तार अधिकारी अशोक गोडसे यांच्यासह इतर अधिकार्यांनी भेट दिली. त्यात या शाळा अनधिकृत असल्याचे दिसून आले. त्यामुळे येत्या शैक्षणिक वर्षात संबंधित शाळांंमध्ये प्रवेश घेऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
शासनाची मान्यता असल्याचे भासवून या शाळांकडून विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देण्यात आला आहे. प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे जमा करणे, अधिकार नसताना पालकांकडून फी वसूल करून आर्थिक गैरव्यवहार करणे, शासकीय नियमांचे पालन न करणे, विद्यार्थ्यांची अनधिकृतरीत्या पटावर नोंदणी करणे, अन्य शाळांकडून नियमबाह्यरीत्या दाखला मागणी करणे, शासनाचा महसूल बुडवून शासनाची, पालकांची व विद्यार्थ्यांची फसवणूक करणे, शाळा बंद केलेबाबत शिक्षण विभागास दिशाभूल करणारी माहिती देणे, पालकांकडून भरमसाट फी वसूल करून नफेखोरी करणे, शासन नियमानुसार भौतिक सुविधा उपलब्ध नसणे, शाळेच्या दर्शनी भागावर शाळा मान्यता क्रमांक, संलग्नता क्रमांक, यु-डायस क्रमांक प्रदर्शित न करणे, अशा बाबी शिक्षण विभागाकडून केलेल्या तपासणीत निदर्शनास आल्या आहेत.
हेही वाचा