कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : ढगांचा गडगडाट, विजेच्या कडकडाटासह धुवाँधार पावसाने बुधवारी जिल्ह्याला झोडपून काढले. राधानगरी धरण क्षेत्रासह जिल्ह्याच्या अनेक भागांत मुसळधार पाऊस झाला. पहाटे पाच पासून सकाळी 11 वाजेपर्यंत मुसळधार पाऊस कोसळला. पावसाने भात, भुईमूग, नाचणी पिकांना फटका बसला असून शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पावसामुळे ऊस तोडणी दहा-पंधरा दिवस लांबणीवर पडणार आहे. पावसाने व्यापारी, विक्रेत्यांनाही फटका बसला आहे. पिरळ (ता. राधानगरी) व बानगे (ता. कागल) येथे घरांवर वीज पडून नुकसान झाले. अंबप (ता. हातकणंगले) येथे पुणे-बंगळूर महामार्गावर पाणी साचले होते. बुधवारी पहाटे तीन-साडेतीनपासूनच जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली. पहाटे पाचपासून पावसाचा जोर वाढला.
सकाळी सहा ते नऊ वाजेपर्यंत अनेक भागांत मुसळधार पाऊस झाला. पावसाचा जोर इतका होता की, शहरात अनेक भागांत पाणी साचले. साचलेल्या पाण्यातून मार्ग काढताना नागरिकांसह वाहनधारकांनाही कसरत करावी लागत होती. सकाळपासूनच पाऊस असल्याने शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच नोकरदार-कामगारांना छत्र्या, रेनकोट घेऊनच घराबाहेर पडावे लागले. पावसाचा व्यापारी, विक्रेत्यांना मोठा फटका बसला. अनेकांनी तर सकाळी दहानंतरच दुकाने उघडली. बहुतांशी बाजारपेठेत दुपारपर्यंत शुकशुकाट होता. दुपारनंतर पाऊस थांबला मात्र, रात्री हवेत गारठा होता.
जिल्ह्यात पावसाने शेतकर्यांचे हाल झाले. मळणी झालेले भात तसेच कापणीसाठी आलेले भात पिकांचे तसेच भुईमूग आणि नाचणी पिकांचे नुकसान झाले. वीटभट्ट्यांचेही पावसाने नुकसान झाले. पावसाने शेतात पाणी साचल्याने ऊस तोडी लांबणार आहेत. दरम्यान, बुधवारी झालेला पाऊस रब्बी पिकांच्या लागवडीसाठी मात्र, पोषक ठरणार आहे. पावसाने पन्हाळा, गगनबावडा, शाहूवाडी आणि राधानगरी तालुक्यांत अनेक ओढ्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली.
जिल्ह्यात गेल्या आठ तासांत सरासरी 6.9 मि.मी.पाऊस झाला. राधानगरी तालुक्यात तब्बल 37.8 मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाली. भुदरगड तालुक्यात 10.6 मि.मी., कागल तालुक्यात 9.3 मि.मी.,चंदगडमध्ये 8 मि.मी., आजरा तालुक्यात 4.9 मि.मी., शाहूवाडीत 4.8 मि.मी.,करवीरमध्ये 3.4 मि.मी., गगनबावडा आणि हातकणंगले तालुक्यात प्रत्येकी 1.9 मि.मी., गडहिंग्लजमध्ये 1.8 मि.मी., पन्हाळ्यात 0.8 मि.मी. तर शिरोळ तालुक्यात 0.7 मि.मी. पाऊस झाला.