

विश्रांतवाडी : पुढारी वृत्तसेवा : विद्यानगर, प्रतीकनगर, धानोरी, लोहगाव परिसराचा झपाट्याने विकास होत असलेल्या भागासाठी विश्रांतवाडी ही महत्त्वाची बाजारपेठ आहे. असे असले तरी येथील पार्किंगची समस्या सोडविण्यासाठी महापालिका प्रशासन व वाहतूक पोलिसांकडून ठोस उपाययोजना होत नसल्याने वाहनचालक 'नो पार्किंग'चा दंड भरून बेजार झाले आहेत. या ठिकाणी सम-विषम तारखेनुसार पार्किंगची व्यवस्था करण्याची मागणी होत आहे.
विश्रांतवाडी-आळंदी रस्त्यावरील सुमारे अर्धा किलोमीटर परिसरात रस्त्याच्या दोन्ही बाजूला व्यावसायिक इमारती, बँका, हॉस्पिटल, मॉल, भाजी मंडई, मोबाईल व इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंची दुकाने आहेत. परिसरातील चार ते पाच किलोमीटर अंतरावरील नागरिक या ठिकाणी विविध वस्तूंच्या खरेदीसाठी येतात. या भागात पार्किंग व्यवस्थेचा अभाव असल्याने वाहनचालक रस्त्याच्या कडेला वाहने उभी करतात. विशेषतः जय गणेश विश्व या इमारतीच्या परिसरात पार्किंगची व्यवस्था उपलब्ध नाही.
तसेच सर्व्हिस रस्त्यावरही 'नो पार्किंग' आहे. मात्र, पर्याय नसल्याने वाहनचालक रस्त्यावर वाहने उभी करतात. नो पार्किंगमधील वाहनांवर वाहतूक विभागाकडून सातत्याने कारवाई केले जाते. तडजोड शुल्क पाचशे रुपये व दुचाकी पोलिस ठाण्यात उचलून नेल्यास 785.56 रुपये दंड वाहनचालकांकडून आकारला जात असल्याचे वाहतूक विभागाकडून सांगण्यात आले.
पार्किंगची व्यवस्था उपलब्ध नसल्याने दंडाचा भुर्दंड सहन करावा लागत असल्याने खरेदीसाठी येणारे ग्राहक व व्यावसायिकांमध्ये नाराजी आहे. व्यावसायिकांनी एकत्र येत परिसरातील पार्किंगच्या समस्येसंदर्भात वाहतूक पोलिस व महापालिकेला निवेदन दिले असून, या भागात सम-विषम तारखेनुसार पार्किंगची व्यवस्था उपलब्ध करण्याची मागणी केली आहे. याविषयी पोलिस निरीक्षक शैलेश संखे यांना विचारले असता मी निवेदन पाहिलेले नाही, असे त्यांनी सांगितले.
विश्रांतवाडी परिसरातील बाजारपेठेत पार्किंगची सुविधा उपलब्ध नसल्याने वाहनचालकांना दंडाचा भुर्दंड सोसावा लागत आहे. या ठिकाणी सम, विषम तारखेनुसार पार्किंगची व्यवस्था उपलब्ध करावी.
– विनोद पवार,
व्यावसायिक, विश्रांतवाडीजय गणेश विश्वमधील पार्किंग व्यवस्था अपुरी आहे. रस्त्यावर वाहन उभे केल्यास वाहतूक पोलिस ती उचलून नेतात. त्यामुळे आमच्या व्यवसायावर परिणाम होत आहे.
– सागर मदने,
व्यावसायिक, विश्रांतवाडी
हेही वाचा