पुणे : जिल्ह्यातील 231 ग्रामपंचायत निवडणुकीचा रणसंग्राम नुकताच पार पडला. या निवडणुका तरुणांच्या एन्ट्रीमुळे चांगल्याच गाजल्या. जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचा कारभार आता तरुणांच्या हातात आला आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघातील चारही तालुक्यांत निवडून आलेले बहुतांश सरपंच व ग्रामपंचायत सदस्य हे 40 वर्षांच्या आतील आहेत. 'व्हिलेज डेव्हलपमेंट प्लॅन' घेऊन हे तरुण राजकारणात सक्रिय होताना दिसत आहेत. ग्रामपंचायत निवडणुका म्हटलं की, गावातील ज्येष्ठ लोकांचे काम असाच समज होता; परंतु कोरोनानंतर जिल्ह्यातील हे चित्र बदलले आहे.
तरुण पिढीला गावाच्या विकासाचे महत्त्व पटल्याने आपल्या शिक्षणाचा फायदा गावाच्या विकासासाठी झाला पाहिजे यासाठी तरुणवर्ग गावाच्या राजकारणात अधिक सक्रिय होताना दिसत आहेत. यामध्ये शासनाने वित्त आयोगाचा निधी थेट ग्रामपंचायतींना देण्याचा निर्णय घेतला, याशिवाय जलजीवन मिशन अंतर्गतदेखील गावोगाव लाखो-कोट्यवधी रुपयांची कामे सुरू आहेत. तसेच खेड- शिरूर तालुक्यातील एमआयडीसी भागातील ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्याला वेगळाच मान असतो. पदाचा वापर करून चार-दोन कामेदेखील मिळवता येतात. यामुळेच केवळ राजकारण नाही तर उत्पन्नाचे साधन म्हणूनदेखील तरुण ग्रामपंचायत निवडणुकीत सक्रिय होताना दिसत आहे.
शिरूर लोकसभा मतदारसंघातील जुन्नर, आंबेगाव, खेड आणि शिरूर तालुक्यात बहुतेक सर्व ग्रामपंचायतींमध्ये मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग सरपंच, सदस्य म्हणून निवडून आले आहेत. यात अनेक तरुणांनी गावातील प्रस्थापितांना धक्का देऊन आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. यात अनेक तरुण पक्षीय राजकारणात नाही, तर गावांच्या विकासासाठीच राजकारणात सक्रिय होत आहेत.
गावाच्या विकासासाठी निवडणूक रिंगणात
गावचा विकास हाच मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेऊन मी निवडणुकीच्या रिंगणात उतरलो. मागील पंचवार्षिक निवडणुकीत माझ्या पत्नीने लोकनियुक्त सरपंच म्हणून संतोषनगर ग्रामपंचायतीचा कारभार पाहिला. या पाच वर्षांत गावात अनेक विकास कामे केली. गावातील तरुण, होतकरू मुलांना हाताशी धरून आम्ही विकासाचा डोंगर उभा केला आणि विकास कामांच्या जोरावरच लोकांनी आमच्यावर विश्वास दाखवत पुन्हा एकदा पाच वर्षे ग्रामपंचायतीचा कारभार आमच्या हातात दिल्याचे संतोषनगर (ता. खेड) येथील सरपंच शरद कड यांनी सांगितले.
मागील पाच वर्षांत गावात 14 ते 15 कोटी रुपयांची विकासकामे केली, तसेच मोठ्या प्रमाणात वैयक्तिक लाभाच्या विविध योजनांही राबविल्या. यामुळेच आमच्या विरोधात गावातील सर्व ज्येष्ठ व प्रस्थापित एकत्र येऊनही आणि मोठ्या प्रमाणात घोडेबाजार होऊनदेखील आमचे तरुणांचे पूर्ण पॅनेलच विजयी झाले. आता पुन्हा नव्याने गावाच्या विकासासाठी प्रयत्नशील राहणार.
नियम अजिंक्य घोलप (एमबीए) , लोकनियुक्त सरपंच, खामगाव, ता. जुन्नरमाझे इंजिनिअरिंगचे शिक्षण झाल्यानंतर नोकरी की व्यवसाय असे दोन पर्याय होते, पण मी नोकरी न करता गावात राहून व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. यासोबतच गावच्या राजकारणात देखील हळूहळू सहभाग घेऊ लागलो. गावाच्या राजकारण शिकलेले, उच्चशिक्षित तरुण आले की विकासामध्ये नक्कीच सकारात्मक भर पडतो. मागील पंचवार्षिक निवडणुकीत उपसरपंच म्हणून काम केले. यावेळी मला निवडणुकीत पाडण्यासाठी सर्व विरोधक एकत्र आले, अनेक वेगवेगळ्या मार्गांचा वापर केला, तरीदेखील विकासकामे व लोकांचा विश्वास म्हणून ग्रामपंचायत सदस्य म्हणून पुन्हा निवडून आलो.
-राहुल पवार, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर सदस्य, रांजणगाव ग्रामपंचायत, ता. शिरूर