पुण्यात साकारले जाणार देशातील पहिले ऑलिम्पिक भवन | पुढारी

पुण्यात साकारले जाणार देशातील पहिले ऑलिम्पिक भवन

सुनील जगताप

पुणे : राज्यातील पुण्यात देशातील पहिले ऑलिम्पिक भवन साकारण्यात येणार असून, या भवनमध्ये पहिले ऑलिम्पिझम ही उभारले जाणार आहे. त्यासाठीची क्रीडा विभाागाच्या वतीने वेगाने हालचाली झाल्या असून, सार्वजनिक बांधकाम विभागाला प्रस्तावही सादर केल्याची माहिती क्रीडा विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिली. महाराष्ट्रातील पुण्यामध्ये देशातील पहिले ऑलिम्पिक भवन साकारले जात आहे. 20 कोटींच्या या इमारतीसाठी शासनाच्या वतीने म्हाळुंगे बालेवाडीतील श्रीशिवछत्रपती क्रीडा संकुल येथील क्रीडा प्रबोधिनीच्या वसतिगृहाजवळील अडीच एकर जागाही मंजूर केली आहे. याशिवाय शासनाच्या वतीने सुरुवातीला दोन कोटींचा निधीही उपलब्ध करून देण्यात आला. या भवनमध्ये राज्यातील सर्व संघटनांच्या मुख्य कार्यालयांसह जिम, क्रीडाविश्वातील पुस्तकांच्या ग्रंथालयासारखे सर्व एकाच ठिकाणी असणारे हे देशातील पहिलेच ऑलिम्पिक भवन ठरणार आहे.
संबंधित बातम्या :
दिल्लीतील संग्रहालयाचे काय ?
तत्कालीन केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी 2020 मध्ये ‘ऑलिम्पिझम आणि 21 व्या शतकातील ऑलिम्पिक शिक्षण’, या विषयावर आंतरराष्ट्रीय वेबिनारमध्ये देशात एक ऑलिम्पिक संग्रहालय (म्युझियम) असावे, असे मत व्यक्त करून त्यांनी एक उत्कृष्ट दर्जाचे ऑलिम्पिक संग्रहालय उभारण्यासंदर्भात चर्चा करून दिल्लीत नॅशनल स्टेडियममध्ये उभे राहील, असे सुतोवाच केले होते. परंतु, त्यावर पुढे काहीच हालचाल झालेली नाही.
ऑलिम्पिक भवन आणि म्युझियमसाठी क्रीडा विभागाकडून जागा अंतिम झाली आहे. त्यासाठी जागेची मेाजणी, नकाशा तयार करणे यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाशी संपर्क साधला आहे. त्यांना त्यासाठीचा 20 कोटी रुपयांचा निधी वर्ग करण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ही यासंदर्भातील कार्यवाही सुरू  झाली असून, लवकरच बांधकामाला सुरुवात करण्यात येईल.
                                                           – सुधीर मोरे,  सहसंचालक, क्रीडा व युवक सेवा संचालनालय

Back to top button