नाशिक : पुढारी वृत्तसेवा; तांत्रिक कारण पुढे करीत नाशिक-दिल्ली विमानसेवा बंद केल्याने प्रवासी, उद्योजक, पर्यटकांमध्ये काहीसा नाराजीचा सूर बघावयास मिळत आहे. अशात लवकरच नाशिक-दिल्ली तसेच नाशिक बेंगळुरू ही सेवा सुरू करण्यावर भर दिला जाणार असल्याची स्पष्टोक्ती इंडिगो कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पीटर एल्बर्स यांनी दिली आहे.
इंडिगोरीच आणि इंटरग्लोब फाउंडेशनकडून आयोजित चौथ्या 'माय सिटी माय हेरिटेज' वॉकसाठी प्रथमच नाशिकमध्ये आलेल्या पीटर एल्बर्स यांनी पत्रकारांशी संवाद साधला. एल्बर्स म्हणाले की, धार्मिक वारसा तसेच औद्योगिक प्रगतीमुळे नाशिकचा लौकिक जगभर आहे. नाशिकला मोठा इतिहास असून, येथील सुला जगभरात पोहोचली आहे. अशात नाशिक देशातील प्रत्येक शहराला जोडले जावे, असा आमचा आग्रह असेल. सध्या इंडिगोकडून नाशिकहून अहमदाबाद (दोन फ्लाइट्स), नागपूर, गोवा, इंदूर व हैदराबाद या पाच शहरांसाठी सेवा दिली जात आहे. लवकरच नवी दिल्ली आणि बंगळुरू ही सेवा सुरू करण्यास आमचे प्राधान्य असेल. तसेच नाशिकहून होपिंग फ्लाइटच्या माध्यमातून देशातील तब्बल ८२ शहरांना जाोडणे शक्य असल्याने, त्यादृष्टीनेही कंपनीकडून प्रयत्न केले जाणार आहेत.
इंडिगो कंपनीच्या माध्यमातून देशातील ८५ शहरांमध्ये सेवा दिली जात असून, अधिकाधिक शहरांशी कनेक्टिव्हिटी वाढविण्याचा मानस असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी नाशिकहून कार्गो सेवेविषयी सांगितले की, सध्या इंडिगोकडून पॅसेंजर फ्लाइट सेवा दिली जात आहे. मात्र, भविष्यात कार्गो फ्लाइटचा कंपनी नक्कीच विचार करेल. नाशिकचे कौतुक करताना नाशिकमध्ये प्रचंड क्षमता असून, या शहराची कनेक्टिव्हिटी वाढविण्यासाठी शहरांचे बॅण्डिंग होण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. यावेळी इंटरग्लोब फाउंडेशनच्या चेअरपर्सन रोहिणी भाटिया उपस्थित होत्या.
नाशिक-दुबई फ्लाइट अफवा
इंडिगो कंपनीकडून नाशिकहून-दुबई फ्लाइट सुरू होणार असल्याची चर्चा होती. मात्र, ही अफवा असल्याचे सीईओ एल्बर्स यांनी स्पष्ट केले. नाशिक विमानतळावर आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त झाल्यानंतर नाशिकहून कोणत्या देशात फ्लाइट सुरू होतील, याबाबत उत्सुकता आहे. अशात इंडिगोकडून नाशिक-दुबई फ्लाइट सुरू केली जाणार असल्याचे बोलले जात होते, मात्र ही अफवा असल्याचे एल्बर्स यांनी सांगितले.
हेही वाचा :