विधानसभा निवडणूक : राजस्थानात काँग्रेसचे महिला कार्ड

विधानसभा निवडणूक : राजस्थानात काँग्रेसचे महिला कार्ड

राजस्थानात काँग्रेसने महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी मोठा राजकीय डाव खेळला आहे. पक्षाने सत्ता राखण्यासाठी प्रत्येक कुटुंबातील प्रमुख महिलेस वार्षिक दहा हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे. तसेच राजस्थानातील 1 कोटी 5 लाख कुटुंबांना पाचशे रुपयांत गॅस सिलिंडर देण्याची हमी दिली आहे. राजस्थानात ज्येष्ठ महिला म्हणजे 60 ते 99 वयोगटातील महिला मतदारांची संख्या पुरुषांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे या राज्यातील राजकारण करताना राजकीय पक्ष महिलांंना अधिक महत्त्व दिल्याचे दिसत आहे.

राजस्थानच्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसचा असणारा संघर्ष याहीवेळेस पाहावयास मिळत आहे. भाजप काँग्रेसला सत्तेतून हद्दपार करण्यासाठी प्रयत्न करत आहे. अशा वेळी महिलांसाठी काँग्रेसने जाहीर केलेल्या घोषणा हा मोठा राजकीय डाव मानला जात आहे. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांंच्या झुंझुनू येथील सभेत मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी दोन घोषणा केल्या. यावेळी सभेत बोलताना प्रियांका गांधी यांनी केंद्र सरकारवर प्रखर हल्ले केले. सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांतून रोजगार निर्मिती व्हायची. मात्र या कंपन्या सरकारने उद्योगपती मित्रांना विकण्याचे कारस्थान रचले आहे, असा आरोप केला. प्रियांका म्हणाल्या, काँग्रेसने जुनी पेन्शन योजना लागू करण्याची हमी दिली आहे. राज्य कर्मचार्‍यांच्या हितासाठी उचलले हे पाऊल भाजपला मात्र मान्य नाही. केंद्र सरकारकडे कर्मचार्‍यांना देण्यासाठी पैसे नाहीत. मात्र त्यांनी आपल्या सोयीसुविधांसाठी 16 हजार कोटी रुपयांत दोन विमानांची खरेदी केली. कर्मचार्‍यांना देण्यासाठी मोदी सरकारकडे पैसे नाहीत; मात्र संसद भवनाची नवी इमारत उभारण्यावर हजारो कोटी रुपये खर्च केले.

झुंझुनूच्या सभेवेळी मुख्यमंत्री गेहलोत यांच्यासह काँग्रेसच्या अन्य नेत्यांनी प्रियांका गांधी यांचे स्वागत केले. यावेळी राष्ट्रीय महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा ममता शर्मा यांनी काँग्रेसचे सदस्यत्व स्वीकारले. किशनगड येथील भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढणारे विकास चौधरी यांनीही काँग्रेसच्या धोरणावर विश्वास ठेवत पक्ष सदस्यत्व स्वीकारले. धौलपूरच्या आमदार शोभाराणी कुशवाह यांनीदेखील काँग्रेस पक्षात प्रवेश केला. राज्यसभा निवडणुकीच्या काळात काँग्रेसला मत दिल्यानंतर भाजपकडून कुशवाह यांची हकालपट्टी झाली होती. राजस्थानच्या विधानसभा निवडणुकीत प्रियांका गांधी सक्रिय आहेत. त्यांनी राज्यात दोन ते तीन सभा घेतल्या आहेत. प्रियांका गांधींच्या माध्यमातून काँग्रेस पक्ष महिला मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे. मुख्यमंत्री गेहलोत हे प्रत्येक निवडणुकीच्या अगोदर बहिणीचा आशीर्वाद घेतात आणि शुभसंकेत म्हणून बहिणीकडून एक पाकीटही घेतात. त्यात काही रक्कम असते. याबाबत असे म्हटले जाते की, चौथ्यांदा मुख्यमंत्री होण्याच्या उद्देशातून गेहलोत हे याहीवेळेस बहिणीच्या घरी गेले.

बहीणही लहान भावाला निवडणुकीत जिंकण्यासाठी आशीर्वाद देते. त्यामुळे गेहलोतही बहिणीला लकी मानतात. पण यावेळी बहिणीचे पाकीट लकी ठरते की नाही, हे पाहावे लागेल. राजस्थानात प्रत्येक पाच वर्षांनंतर सत्तांतराचा ट्रेंड राहिला आहे. 2013 मध्ये विधानसभा निवडणुकीत भाजपला विजय मिळाला तेव्हा दोन्ही पक्षांतील मतांचा फरक केवळ दहा टक्के होता. तेव्हा काँग्रेसला केवळ 21 जागा मिळाल्या, तर भाजपला 163 जागा. हे प्रचंड बहुमत होते. मात्र 2028 मध्ये सत्तांतर झाले आणि निवडणुकीत काँग्रेसने 39.3 टक्के मतांसह 100 जागा जिंकल्या. त्याचवेळी भाजपला 38.7 टक्क्यांसह 73 जागा मिळाल्या.

बसपने सहा जागा जिंकल्या. अशा वेळी या निवडणुका भाजप आणि काँग्रेससाठी खूप महत्त्वाच्या आहेत. 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अगोदर कोणता पक्ष प्रबळ आहे, याचे संकेत मिळणार आहेत. अर्थात, भाजप आणि काँग्रेससमोर आव्हाने भरपूर आहेत. राजस्थानच्या निवडणुकीत महिलांची महत्त्वाची भूमिका आहे. विशेष म्हणजे ज्येष्ठ महिला म्हणजे 60 ते 99 वयोगटातील महिला मतदारांची संख्या पुरुषांपेक्षा अधिक आहे. अशा वेळी महिलांचे मुद्दे आणि हमी या गोष्टी प्रचारात महत्त्वाच्या ठरत आहेत. या कारणांमुळेच केंद्र सरकारने महिला आरक्षण विधेयक पाच राज्यांच्या निवडणुकीच्या अगोदर संसदेत आणले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news