Pune news : अविनाश भिडे खून प्रकरण : दयानंद इरकलसह तेरा जणांवर गुन्हा | पुढारी

Pune news : अविनाश भिडे खून प्रकरण : दयानंद इरकलसह तेरा जणांवर गुन्हा

पुणे; पुढारी वृत्तसेवा : राजकीय पक्षांचे पदाधिकारी दयानंद इरकल यांच्यासह तेरा जणांवर चतुःशृंगी पोलिस ठाण्यात खुनाच्या आरोपावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेखर महादेव जोगळेकर (58), प्रणव शेखर जोगळेकर (22), दयानंद सिद्राम इरकल (रा. पांडवनगर), बाळू पांडुरंग मिसाळ (54, रा. कर्वेनगर), प्रमोद श्रीरंग शिंदे (29, रा. शिवणे), रूपेश रवींद्र कदम (37, रा. वडारवाडी), संतोष ऊर्फ बंटी दत्तात्रय हरपुडे (38) आणि अन्य अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत रेश्मा अविनाश भिडे (30, रा. धायरी) यांनी फिर्याद दिली आहे. तर, अविनाश आनंद भिडे (36, रा. धायरी) असे मृताचे नाव आहे. ही घटना 1 सप्टेंबर रोजी मॉडेल कॉलनी शिवाजीनगर येथे घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  सप्टेंबर 2022 मध्ये फिर्यादी महिलेचे पती अविनाश यांचे निधन झाले होते. याबाबत  चतुःशृंगी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. दरम्यान, अविनाश हे शेखर जोगळेकर यांच्याकडे कामाला होते. त्यांच्यात पगारावरून वाद होते.
31 ऑगस्ट 2022 रोजी रात्री साडेदहा वाजता जोगळेकर यांनी फोन करून उद्या सकाळी कामावर लवकर येण्यास सांगितले होते.  त्यानुसार अविनाश हे सकाळी साडेसातच्या सुमारास कामावर गेले होते.  त्यानंतर दहाच्या सुमारास फिर्यादींच्या पतीच्या मोबाईलवर फोन करून एकाने सांगितले की, तुमचे पती ऑफिसमध्ये चक्कर येऊन पडले असून, त्यांना सह्याद्री रुग्णालयात दाखल केले आहे. फिर्यादींनी तेथे जाऊन पाहिले असता, जोगळेकर आणि इतर लोक तेथे होती.
त्यांनी फिर्यादींना त्यांच्या पतीचे कपडे असलेली पिशवी दिली. त्यामध्ये कपडे चिखलाने भरलेले आणि फाटलेले होते. त्यानंतर फिर्यादींनी आपल्या पतीला ससून रुग्णालयात दाखल केले होते. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू असताना मृत्यू झाला. डॉक्टरांनी त्यांच्या पतीचा मृत्यू हेड इन्जुरीमुळे झाल्याचे सांगितले. त्यानंतर फिर्यादींनी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार घडल्यानंतर याबाबत सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र, आता मयताच्या तपासावरून तेरा जणांवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
  – बालाजी पांढरे, वरिष्ठ पोलिस नरीक्षक, चतु:शृंगी पोलिस ठाणे 
हेही वाचा

Back to top button