Pakistan | पाकिस्तानच्या मियांवली हवाई तळावर दहशतवादी हल्ला, ३ विमाने पेटवली, ३ दहशतवादी ठार | पुढारी

Pakistan | पाकिस्तानच्या मियांवली हवाई तळावर दहशतवादी हल्ला, ३ विमाने पेटवली, ३ दहशतवादी ठार

पुढारी ऑनलाईन : पाकिस्तानच्या पंजाबमधील मियांवली येथील हवाई दलाच्या तळावर शनिवारी सकाळी मोठा दहशतवादी हल्ला झाला आहे. मियांवली येथील पाकिस्तानी हवाई दलाच्या तळावर अनेक आत्मघाती हल्लेखोरांसह अनेक सशस्त्र जिहादींनी हल्ला केल्याचे वृत्त आहे. सध्या हा हल्ला सुरू असून सुमारे ३ दहशतवाद्यांना पाकिस्तानी सुरक्षा दलांनी ठार केले आहे. मियांवली हवाई तळावर हल्ला झाल्याची पुष्टी पाकिस्तानी लष्कराने केली आहे.

संबंधित बातम्या 

येथे दहशतवादी आणि पाकिस्तानी सुरक्षा दलांत जोरदार चकमक सुरु आहे. या घटनेचे काही व्हिडिओ स्थानिक लोकांनी सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. येथे मोठे स्फोट घडवून आणल्याने आगीचे लोट दिसत आहेत. तेहरिक-ए-जिहाद पाकिस्तान (टीजेपी) या गटाने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

दहशतवाद्यांनी मियांवली येथे कुंपणाच्या भिंतीवरून हवाई दलाच्या तळावर जाण्यासाठी शिडीचा वापर केलाचे समजते. तेहरिक-ए-जिहाद पाकिस्तान (TJP) या दहशतवादी गटाने असा दावा केला आहे की, मियांवली येथील हवाई दलाच्या तळावर हल्ला करणारे त्यांचे दहशतवादी अत्याधुनिक शस्त्रांनी सज्ज आहेत आणि त्यांनी मियांवलीतील पाकिस्तानी हवाई दलाच्या दोन कंपाऊंडवर हल्ला केला. त्यांनी हवाई तळावरील ३ विमानांवर हल्ला करून ती नष्ट केली आहेत.

मियांवली हा तोच हवाई तळ आहे जिथे इम्रान खान यांच्या पक्षाच्या समर्थकांनी त्यांच्या अटकेनंतर हल्ला केला होता. एवढेच नाही तर आंदोलकांनी हवाई तळाबाहेरील एका विमानाला आग लावली होती.

दरम्यान, ग्वादरमध्ये सुरक्षा दलांना घेऊन जाणाऱ्या दोन वाहनांवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात १४ जवान शहीद झाले, अशी माहिती लष्कराच्या मीडिया विंगने शुक्रवारी दिली होती.

हवाई तळावरील एक टँकदेखील नष्ट केला आहे. येथे जोरदार धुमश्चक्री सुरु आहे. या हल्ल्याबाबत पाकिस्तानी सैन्याकडून अद्याप कोणतेही निवेदन जारी करण्यात आलेले नाही.

Back to top button