एल्विशच्या रेव्ह पार्टीत सापांच्या विषाचा वापर; पाचजणांना अटक | पुढारी

एल्विशच्या रेव्ह पार्टीत सापांच्या विषाचा वापर; पाचजणांना अटक

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : यूट्यूबर एल्विश यादव याने आयोजित केलेल्या रेव्ह पार्टीत साप आणि सापाचे विष पुरवल्याच्या आरोपावरून नोएडात पाचजणांना अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, रेव्ह पार्टीत सापाचे विष घेण्यात येत होते, असे उघडकीस आले आहे.

दिल्ली आणि परिसरातील वेगवेगळ्या फार्म हाऊसवर रेव्ह पार्टी आयोजित केल्या होत्या. यूट्यूब आणि इन्स्टाग्राम यावर अपलोड करण्यासाठी व्हिडीओ शूट करण्याच्या उद्देशाने एल्विश यादव सापांच्या वापर करायचा. रेव्ह पार्टीतील इतर जण सापाचे विष घ्यायचे. पाच कोब्रा सापांसह एकूण नऊ साप आणि त्यांचे विष आरोपींकडून जप्त करण्यात आले आहे. वन विभागाकडे हे साप सोपवण्यात आले आहेत, अशी माहिती अटक करण्यात आलेल्या पाच आरोपींनी नोएडा पोलिसांना दिली आहे.

रेव्ह पार्टीला येणार्‍या विदेशी नागरिकांसह इतर लोक सापाचे विष प्राशन करायचे. याप्रकरणी एल्विश यादवसह सहा आरोपींविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. एल्विश वगळता सर्वांना पोलिसांनी अटक केली आहे. एल्विश अद्याप फरार आहे.
आरोपी वेगवेगळ्या ठिकाणांहून साप पकडायचे आणि त्यांचे विष काढायचे. या विषाची मोठ्या रकमेला विक्री केली जायची. रेव्ह पार्टीत हे विष पुरवण्यासाठी त्यांना प्रचंड रक्कम दिली जायची. रासायनिक अमली पदार्थांचा शरीरावर विपरीत परिणाम होतो. काही वेळा जीव जाण्याच्या घटनाही घडतात. त्यामुळे रेव्ह पार्टीतील लोक सापाचे विष प्राशन करायचे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

भाजप नेत्या मनेका गांधी यांच्या वन्यजीव प्रेमी संघटनांनी तक्रार दिल्यानंतर नोएडातील सेक्टर 51 मधील रेव्ह पार्टीत पोलिसांनी छापे टाकून आरोपींना अटक केली होती. बिग बॉस ओटीटी सिजन-2 मध्ये जिंकल्यानंतर एल्विश यादव चर्चेत आला होता.

Back to top button