हवेलीतील कोतवालाचा रुबाबच लय न्यारा ! निवड झाल्यावर भव्य मिरवणुक, डान्स, डी.जे.,जेवणावळी | पुढारी

हवेलीतील कोतवालाचा रुबाबच लय न्यारा ! निवड झाल्यावर भव्य मिरवणुक, डान्स, डी.जे.,जेवणावळी

सिताराम लांडगे

लोणी काळभोर:  तलाठी कार्यालयातील ‘कोतवाल’ हा साफसफाई करणे, टपाल वरीष्ठ कार्यालयात पोहोच करणे, दंवडी, नोटीस घरोघरी देणे एवढ्याच कामापुरता असतो. परंतु हवेली तालुक्यात कोतवाल पदी नियुक्तीसाठी चक्क एका राजकीय नेत्यामार्फत मुख्यमंत्री कार्यालयातून फोन आणून  एका बहाद्दराने आपले काम फत्ते केले आहे. एवढे काय या पदात गुंतलेय ते काही समजेना.
निवड झालेला हा कोतवाल एवढ्यावरच थांबला नाही, तर आनंद व्यक्त करण्यासाठी त्याने गावातून चक्क मिरवणुक काढली, डी.जे. लावला, फ्लेक्स बाजी केली, गुलाल उधळला असा थाटामाटात सांग्रसंगीत कार्यक्रम केला. त्यामुळे या कोतवालाची चर्चा संपुर्ण हवेली तालुक्यात गाजू लागाली, त्यामुळे कोतवालाला ‘मला आमदार झाल्या सारखे वाटते’ असे झाले.

संबंधित बातम्या :

हवेलीत नुकत्याच झालेल्या कोतवाल पदासाठी हवेली तालुक्यातील आठ गावांची कोतवाल पदासाठी भरती प्रक्रिया पार पडली. यात बहुतांश उमेदवार हे याच कार्यालयात काम करणारे खासगी कर्मचाही होते. एका गावातील उमेदवाराने तर चक्क एका राजकीय पक्षाच्या शहर प्रमुखाला आपणच कोतवाल व्हावे म्हणून गळ घातली व थेट मुख्यमंत्री कार्यालयातून फोन आणला. चांगले गुणी उमेदवार या स्पर्धेतून बाहेर पडले ते एका फोन मुळे. यानंतर या खासगी कर्मचाऱ्याची निवड झाल्यानंतर त्याच्या गावात मोठा जल्लोष झाला. त्याची भव्य मिरवणूक काढली, डि.जे. लावला डान्सवर थिरकणारा मोठा तरुणवर्ग या मिरवणुकीत सहभागी झाला, मोठा स्टेज उभारला, फ्लेक्स लावले, गुलाळाची उधळण झाली, मोठमोठ्या हारांनी मोठा जंगी सत्कार झाला. त्यानंतर रात्री शेकडो लोकांची मटणावळीच्या पंगती झाल्या.या कोतवालाच्या निवडीचे एवढ्या मोठ्या कौतुकाचे संपूर्ण तालुक्यात जोरदार चर्चा झाली. सोशल मिडीयावर अनेक फोटो व्हायरल झाले.

अनेक अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यालयात बोलवून या कोतवाल महाशयांना पेढे भरवून त्याचा सत्कार केला. एक कोतवालाची निवड झाली या एका दिवसाच्या कार्यक्रमासाठी लाखो रुपयांचा चुराडा केला. विशेष म्हणजे निवड झालेला कोतवाल हा तालुक्यात वादग्रस्त म्हणून ओळखला जातो. खाजगी कर्मचारी म्हणून नेमणूक असताना त्याचे अनेक कारनामे उघड झाले. अनेक तक्रारी वरिष्ठांकडे केल्या गेल्या.  परंतु, अद्यापपर्यंत कोणीही याच्या तक्रारींची दखल घेतली नाही. अखेर या कोतवालाच्या कौतुक समारंभाची चौकशी वरीष्ठ करतील काय हे पाहणे गरजेचे आहे.

Back to top button