Lok Sabha elections 2024 | लोकसभेसाठी महाराष्ट्रात भाजपची रणनीती काय?; बैठकीत चर्चा | पुढारी

Lok Sabha elections 2024 | लोकसभेसाठी महाराष्ट्रात भाजपची रणनीती काय?; बैठकीत चर्चा

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा; भाजपकडून सध्या देशभरातील निवडणुकींचा आढावा घेतला जात आहे. या अंतर्गत महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार, कर्नाटक या राज्यांच्या आढावा घेण्यासाठी एक महत्त्वाची बैठक दिल्लीस्थित भाजप मुख्यालयात घेण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्रात भाजपची तयारी, मित्रपक्षांसोबत संभाव्य जागा वाटप, संवेदनशील मुद्दे, महाराष्ट्रातील ४८ जागांमध्ये जास्तीत जास्त जिंकण्यासाठी रणनीती, निवडणुकीवर परिणाम करणारे घटक अशा मुद्द्यांवर चर्चा केल्याचे समजते. (Lok Sabha elections 2024)

महाराष्ट्रात मराठा आरक्षणासाठी सुरू असलेले आंदोलन, ओबीसी आंदोलन अशा मुद्द्यांवरही चाचपणी केले असल्याचे समजते. देशात २०२४ मध्ये होत असलेल्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही महत्त्वाची बैठक पार पडली. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह महाराष्ट्र, बिहार, उत्तर प्रदेश, कर्नाटक या राज्यांमधील प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित होते. महाराष्ट्रातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे नेते या बैठकीला उपस्थित होते.

Lok Sabha elections 2024 : निवडणुकांचे वारे जोरात

सध्या देशात पाच राज्यांच्या निवडणुकांचे वारे जोरात वाहत आहे. मात्र याच कालावधीमध्ये भारतीय जनता पक्ष येणाऱ्या लोकसभा निवडणुकांची देखील तयारी करत आहे. महाराष्ट्रासह विविध राज्यांमधील १४४ लोकसभा क्षेत्रावर भाजपने विशेष रणनीती तयार करायला सुरुवात केली आहे. या अनुषंगाने रणनीती तयार करण्यासाठी प्रमुख नेत्यांची ही बैठक बोलावण्यात आली होती. या १४४ लोकसभा क्षेत्रांमध्ये लोकसभा प्रवास रणनीती काय असली पाहिजे, कुठले मुद्दे या क्षेत्रांमध्ये महत्त्वाचे आहेत, यावर या बैठकीत चर्चा झाल्याचे समजते. ज्या राज्यांबद्दल या बैठकीत चर्चा झाली त्यामध्ये उत्तर प्रदेशात भाजपची सत्ता आहे, बिहारमध्ये भाजप विरोधी पक्षात आहे, कर्नाटकामध्ये भाजपकडे नाही तर महाराष्ट्रात भाजप मित्र पक्षांसोबत सत्तेत आहे. या चार राज्यांमधील लोकसभेच्या जागा निर्णायक आहेत या अनुषंगाने रणनीती ठरवण्यासंबंधी या बैठकीत चर्चा झाल्याचे समजते.
हेही वाचा

Back to top button