Sassoon News : ससूनमधून कैदी ‘हद्दपार’; डीनही सुटीवर | पुढारी

Sassoon News : ससूनमधून कैदी ‘हद्दपार’; डीनही सुटीवर

पुणे : पुढारी वृत्तसेवा : ससून रुग्णालयात कोणत्या कैद्यांचा किती काळ मुक्काम होता, याबाबतचे वृत्त दै. ‘पुढारी’ने प्रसिद्ध केले होते. त्यामुळे आता ससूनमधून कैदी हद्दपार करण्यात आले आहेत. सध्या ससूनच्या वॉर्ड क्रमांक 16 मध्ये एकही कैदी नाही. गेल्या काही महिन्यांमध्ये ‘हाय प्रोफाईल’ कैद्यांनी गजबजलेलावॉर्ड 16 आता ‘सुना सुना’ झाला आहे. ड्रग तस्करी प्रकरणातील आरोपी ललित पाटील ससून रुग्णालयातून पसार झाल्यानंतर कैद्यांच्या वास्तव्याचे प्रकरण ससून प्रशासनाच्या अंगाशी आले. ससून रुग्णालयामध्ये राजकीय दबाव आणि आर्थिक लाभामुळे कैद्यांना जाणीवपूर्वक आश्रय दिला जात असल्याचा आरोप वारंवार होत आहे.

कैद्यांचा अनेक महिने असणारा मुक्काम, खुद्द डीनने कैद्यांच्या मुक्कामासाठी कारागृहाला लिहिलेले पत्र, कैद्यांच्या मुक्कामासाठी येणारे राजकारण्यांचे फोन, अशा घटना वेगाने घडल्या आणि पाटील प्रकरणानंतर प्रकाशात आल्या. मटकाकिंग विरल सावला, आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातील आरोपी अनिल भोसले, विनय अर्‍हाना, रूपेश मारणे यांच्यासह नऊ कैद्यांची वॉर्ड क्रमांक 16 मध्ये बडदास्त ठेवली जात होती.

दै. ‘पुढारी’ने ही बाब उजेडात आणल्यावर तीनच दिवसांत कैद्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली होती. त्यानंतर, गेल्या महिनाभरात वॉर्ड क्रमांक 16 मध्ये केवळ एका कैद्याला दाखल करून घेण्यात आले आणि उपचार झाल्यावर तीनच दिवसांमध्ये कारागृहात परत पाठवण्यात आले. तीन वर्षांपूर्वी ललित पाटीलला अटक झाल्यानंतर त्याने आजाराचे नाटक करीत ससून रुग्णालयात प्रवेश मिळवला होता. ससूनच्या प्रवेशद्वारावरच त्याच्या दोन साथीदारांना 1 ऑक्टोबर रोजी पोलिसांनी रंगेहाथ पकडले. हा गुन्हा दाखल झाल्यास आता आयुष्यभर कारागृहात खितपत पडावे लागेल, या भीतीने त्याने 2 ऑक्टोबरला रुग्णालयातून पळ काढला. त्यापूर्वी तो रुग्णालयातूनच ड्रगचा पुरवठा करीत होता. त्यावरूनच ससूनमध्ये कैद्यांना किती ’फ—ी हँड’ दिला जात होता, हे समोर आले आहे.

डॉ. ठाकूर चार दिवसांपासून फिरकलेले नाहीत

ललित पाटील प्रकरण उजेडात आल्यापासून ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांनी चुप्पी साधली आहे. पाटील प्रकरणाबाबत त्यांनी आजवर कोणताही खुलासा केलेला नाही. दरम्यान, राज्य शासनाने नेमलेल्या चौकशी समितीने दोन आठवड्यांपूर्वी ससूनमध्ये कसून चौकशी केली आणि अहवाल सादर केला. त्यानुसार लवकरच पुढील कार्यवाही केली जाण्याची शक्यता आहे. असे असतानाच डॉ. ठाकूर गेल्या चार-पाच दिवसांपासून ससूनमध्ये फिरकलेले नाहीत. त्यांनी आठवडाभराची सुटी घेतल्याचे समजते. त्यांच्या अनुपस्थितीमुळे आणखी प्रश्न निर्माण झाले आहेत.

हेही वाचा 

Back to top button