Pune News : लोणी काळभोरला अप्पर तहसीलदार कार्यालय मंजूर | पुढारी

Pune News : लोणी काळभोरला अप्पर तहसीलदार कार्यालय मंजूर

लोणी काळभोर : पुढारी वृत्तसेवा :  हवेली तालुका तहसील कार्यालयाचे विभाजन करून पूर्व हवेलीसाठी स्वतंत्र, नवीन अप्पर तहसील कार्यालय उभारण्यासाठीची मंजुरी गुरुवारी (दि.2) मिळाली. लोणी काळभोर येथे हे नवीन अप्पर तहसील कार्यालय उभारण्यात येणार आहे. शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्या प्रयत्नांना यामुळे यश आले आहे. या नवीन अप्पर तहसील कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात थेऊर, वाघोली, उरुळी कांचन अशा तीन मंडलांचा समावेश आहे. एकूण 44 गावांचा समावेश असून, एक अप्पर तहसीलदार व एक महसूल सहायक ही दोन पदे मंजूर केली आहेत. हवेली तालुक्याची लोकसंख्या 35 लाख असून, ती राज्यातील काही जिल्ह्यांच्या दुप्पट किंवा तिप्पट असल्याने या तालुक्याचे विभाजन होऊन तीन तहसीलदार कार्यालयात कामकाज चालावे, अशी मागणी आमदार अशोक पवार हे 2013 पासून सातत्याने करत होते.

संबंधित बातम्या :

स्वतंत्र तालुका निर्माण होत नाही म्हणून राज्य शासनाने 2013 मध्ये एक मध्यम मार्ग काढून पिंपरी-चिंचवड अप्पर तहसील कार्यालयाची निर्मिती केली व या कार्यालयात पिंपरी-चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रातील गावांचा समावेश केला. यानंतर पुन्हा आ. पवार यांनी पूर्व हवेली तालुक्यासाठी स्वतंत्र तहसील कार्यालय स्थापनेचा मुद्दा विधानसभेत मांडला. तत्कालिन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी पूर्व हवेली तालुक्यात स्वतंत्र कार्यालय देण्यात येईल व लवकर निर्णय घेऊ, असे सांगितले व अप्पर तहसील कार्यालयाच्या विभाजनाची प्रक्रिया सुरू झाली.

हवेली तालुक्यांतील नागरिकांची महसुली कामात सर्वात मोठा तालुका असल्याने दिरंगाई होत होती. एका कार्यालयाचे तीन कार्यलयात विभाजन करण्याचे आश्वासन मी दिले होते, या आश्वासनाची पूर्तता केल्याचे समाधान होत आहे. यापुढे तालुक्यांतील नागरिकांची महसुली कामे जलदगतीने होऊन लवकर कामांचा निपटारा होईल.
                                                अशोक पवार, आमदार, शिरूर-हवेली.

Back to top button