Pune News : बाणेर ते संचेती हॉस्पिटल विनासिग्नल!

Pune News : बाणेर ते संचेती हॉस्पिटल विनासिग्नल!
पुणे : पुढारी वृत्तसेवा : बाणेर ते संचेती हॉस्पिटल यादरम्यान विनासिग्नल प्रवास होण्यासाठी या मार्गावरील विविध चौकांमध्ये ग्रेडसेपरेटर करण्याचे नियोजन करण्यात येत असल्याची माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत (पीएमआरडीए) हिंजवडी ते शिवाजीनगर या दरम्यान मेट्रो प्रकल्प राबवण्यात येणार आहे. या प्रकल्पाचे काम सध्या प्रगतिपथावर आहे. मेट्रो प्रकल्पाला अडसर ठरणारे गणेशखिंड रस्त्यावरील विद्यापीठ चौकातील दोन उड्डाणपूल पाडण्यात आले आहेत. या चौकात एकाच खांबावर दुमजली पूल उभारून त्याच्या वरच्या भागावर मेट्रो आणि खाली दुहेरी वाहतुकीचा उड्डाणपूल बांधण्याचे नियोजन आहे.
तसेच, या चौकात शिवाजीनगरकडून औंधकडे जाणार्‍या वाहनांसाठी ग्रेड सेपरेटर करण्यात येणार आहे. सेनापती बापट रस्त्यावरून बाणेर आणि पाषाणकडे जाण्यासाठी उड्डाणपुलाला दोन लेन रॅम्पद्वारे जोडण्यात येणार आहेत. हरे कृष्ण मंदिर पथ येथे 2 + 2 लेन ग्रेड सेपरेटर, सिमला ऑफिस चौकात दोन लेन ग्रेड सेपरेटर आणि अभिमानश्री चौकात ग्रेड सेपरेटर उभारण्यात येणार आहेत.
याशिवाय, बाणेर ते संचेती हॉस्पिटल चौक या दरम्यान वहानचालकांना विना सिग्नल येता यावे, यासाठी या दरम्यान येणार्‍या चौकांमध्ये ग्रेड सेपरेटर करण्याचे महापालिकेच्या विचारधीन असल्याचे आयुक्तांनी सांगितले.

झाडे तोडण्यासाठी सूचना व हरकती

विद्यापीठ चौकातील मेट्रो आणि उड्डाणपुलाच्या कामासाठी गणेशखिंड रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येणार आहे. यासाठी गणेशखिंड रस्त्यालगतची झाडे तोडावी लागणार आहेत. तोडण्यात येणार्‍या झाडांसंदर्भात जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे. या झाडांवर हरकती व सूचना करण्यासाठी नागरिकांना सात दिवसांची मुदत देण्यात येणार आहे. हरकती व सूचनांवर सुनावणी घेतल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाणार असल्याचे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले.
हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news