Pune News : पुण्यातील झोपडपट्ट्यांसाठी क्लस्टर

Pune News : पुण्यातील झोपडपट्ट्यांसाठी क्लस्टर

पुणे; पुढारी वृत्तसेवा : महापालिकेने स्वतःच्या जागेवरील झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात प्रामुख्याने क्लस्टर पध्दतीने म्हणजेच लगतच्या परिसरातील दोन अथवा त्यापेक्षा अधिक झोपडपट्ट्यांचे एकत्रितरीत्या पुनर्वसन करण्याची चाचपणी करून त्यास प्राधान्य दिले जाणार आहे. महापालिकेच्या या निर्णयामुळे शहरातील रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेला गती मिळू शकणार आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात जवळपास साडेपाचशेहून अधिक झोपडपट्ट्या आहेत. यामध्ये राहणार्‍या जवळपास 40 टक्के नागरिकांना हक्काचे घर देऊन त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी राज्य शासनाने झोपडपट्टी पुनर्वसन योजना (एसआरए) आणली. मात्र, गेल्या अठरा वर्षांत या योजनेच्या माध्यमातून खूपच कमी योजना मार्गी लागल्या. त्यामुळे पुनर्वसनाचा प्रश्न कायम आहे. तो सोडविण्यासाठी पालिकेनेच पुढाकार घेतला आहे. पालिकेच्या 22 भूखंडांवर झोपडपट्ट्या आहेत. त्यावर महापालिकेच्या माध्यमातूनच एसआरए योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात मंगळवारी महापालिका आणि एसआरएच्या अधिकार्‍यांची बैठक झाली.

पालिकेच्या भूखंडावरील झोपडपट्ट्या

कल्याणीनगर पूल झोपडपट्टी, यशवंतनगर, येरवडा सुभाषनगर, भारतनगर, जिजामातानगर, सादलबाबा दर्गा ते चिमा उद्यान, सागर कॉलनी, कोथरूड बर्निंग घाट, ढोले पाटील रस्ता, पॉप्युलर हाइट, बंडगार्डन पांचाळवस्ती, धनकवडी पाटील वीटभट्टी, श्रमिकवस्ती, रामनगर, रामटेकडी, लोहियानगर, भवानी पेठ, भावस्कर कार्यालय, घोरपडे पेठ, जोशीवस्ती, घोरपडे पेठ, धोबीघाट, जोशी समाजवस्ती, गंज पेठ 633, महात्मा फुले पेठ समताभूमी.

महापालिकेच्या मालकीच्या जागांवरील झोपडपट्टी पुनर्वसन करण्यासंदर्भात प्राथमिक बैठक झाली. तीत झोपडपट्ट्यांच्या जागेवर असलेली आरक्षणे, जागेची मोजणी करणे, यातून किती क्षेत्र मोकळे होणार आहे, याचा अभ्यास केला जाणार आहे. झोपडपट्टीमध्ये राहणार्‍या नागरिकांना स्वतःचे चांगले घर देण्याचा प्रयत्न महापालिकेचा आहे.
विक्रम कुमार, आयुक्त

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news