Maharashtra-Karnataka border dispute | महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी सुनावणी पुन्हा लांबणीवर | पुढारी

Maharashtra-Karnataka border dispute | महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी सुनावणी पुन्हा लांबणीवर

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात आज बुधवारी (दि.१) होणारी सुनावणी लांबणीवर पडली आहे. त्रिसदस्यीय खंडपीठातील एक न्यायमूर्ती रजेवर असल्यामुळे सुनावणी लांबणीवर पडली असून पुढील सुनावणी जानेवारीत होणार आहे. (Maharashtra-Karnataka border dispute)

सर्वोच्च न्यायालयाच्या संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार बुधवारी सीमाप्रश्नावर सुनावणी होणार होती. न्यायमूर्ती संजय किशन कौल, न्यायमूर्ती सुधांशू धुलिया आणि न्यायमूर्ती प्रशांतकुमार मिश्रा यांचे नवे खंडपीठ स्थापन करण्यात आले आहे. सीमाप्रश्नी गेल्या तीन वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी रेंगाळली आहे.

संबंधित बातम्या 

खंडपीठात सातत्याने महाराष्ट्र किंवा कर्नाटकातील न्यायमूर्ती नियुक्त करण्यात येत होते. त्यामुळे, नैतिकतेच्या मुद्द्यावर या खटल्याची सुनावणी होऊ शकलेली नाही. महाराष्ट्र सरकारने तटस्थ न्यायमूर्ती नेमावेत, अशी मागणी न्यायालयाकडे केली होती. त्यानुसार बुधवारी सुनावणी होणार होती. तथापि, खंडपीठातील एक सदस्य अनुपस्थित राहणार असल्यामुळे बुधवारची सुनावणी लांबणीवर पडली आहे. कर्नाटकचे कायदा मंत्री एच. के. पाटील यांनीही सीमाप्रश्नाची सुनावणी लांबणीवर पडली असून ती जानेवारी महिन्यात होणार असल्याचे सांगितले. यापुढे सुनावणी लांबणीवर पडणार नाही. याबाबत मी सीमा संरक्षक आयोगाचे अध्यक्ष शिवराज पाटील आणि इतर तज्ज्ञांशी चर्चा केली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

Back to top button