Pimpri News : पोलिस आयुक्तांसह वरिष्ठ अधिकारी ‘ऑन फिल्ड’

Pimpri News : पोलिस आयुक्तांसह वरिष्ठ अधिकारी ‘ऑन फिल्ड’
Published on
Updated on

'पिंपरी ; पुढारी वृत्तसेवा : मराठा समाजबांधवाच्या आंदोलनामुळे राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. आरक्षणासाठी मराठा तरुण आक्रमक झाल्याने ठिकठिकाणी जाळपोळ, तोडफोडीसारख्या घटना घडत आहेत. या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, सहआयुक्त डॉ. संजय शिंदे यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकारी सकाळी सात वाजल्यापासून 'ऑन फिल्ड' आहेत. ज्यामुळे काही किरकोळ अपवाद वगळता मंगळवारी (दि. 31) शहरात कोठेही अनुचित प्रकार घडला नाही. जालना येथील अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलनादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला.

ज्यामुळे सकल मराठा समाज आक्रमक होऊन राज्यभर आंदोलन पेटले. दरम्यान, सरकारला आरक्षणासाठी चाळीस दिवसांचा अल्टिमेटम दिल्यानंतर मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा बेमुदत उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या समर्थनार्थ राज्यात ठिकठिकाणी मराठा समाजबांधव रस्त्यावर उतरला आहे. दरम्यान, काही ठिकाणी तरुण आक्रमक झाल्याने जाळपोळ, तोडफोडीसारख्या घटना घडल्या. ज्यामुळे पोलिस यंत्रणेवर मोठा ताण आला आहे.

राज्यभर आंदोलक आक्रमक झाले असताना मराठा क्रांती मोर्चाने मंगळवारी (दि. 31) शहर बंदची हाक दिली. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती निर्माण झाली होती. मात्र, पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, सहआयुक्त डॉ. संजय शिंदे यांनी पहाटेच घराबाहेर पडून सूत्रे हाती घेतली. सर्व परिस्थितीचा आढावा घेऊन सकाळी सातपासून चौबे आणि शिंदे 'ऑन फिल्ड' असल्याचे दिसून आले. वरिष्ठ अधिकारी स्वतः रस्त्यावर उतरल्याने बंदोबस्तावरील सर्वजण दिवसभर 'अलर्ट' राहिले. परिणामी शहरात सांगवी, सुस येथील काही किरकोळ अपवाद वगळता कोठेही अनुचित प्रकार घडल्याची सायंकाळी उशिरापर्यंत नोंद नव्हती.

महामार्गावर सतर्क 'पेट्रोलिंग'

राज्यात होणार्‍या कोणत्याही आंदोलनाचे पडसाद महामार्गांवर उमटतात. त्यामुळे अवघ्या काही मिनिटांतच वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून राज्यभर चर्चेचा विषय ठरतो. त्यामुळे पिंपरी- चिंचवड पोलिसांनी मुंबई- बंगळुर, पुणे- नाशिक आणि जुन्या पुणे- मुंबई महामार्गावर गस्तीवरील वाहने तैनात केली होती.

सायबर सेलचाही 'वॉच'

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील काही कार्यकर्त्यांवर पोलिसांनी लक्ष ठेवले होते. तसेच, काही अफवा पसरवली जाऊ नये, यासाठी सायबर सेल सोशल मीडियावर लक्ष ठेऊन होते.
साप्ताहिक सुट्यांसह रजाही बंद
अपुर्‍या मनुष्यबळामुळे पिंपरी- चिंचवड पोलिस आयुक्तालयातील सर्व पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांच्या साप्ताहिक सुट्यांसह सर्व प्रकारच्या रजा बंद करण्यात आल्या आहेत. पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत.

पोलिसांनी टायरच केले जप्त

आंदोलक टायर जाळून रस्ता अडवण्याचा प्रयत्न करीत असल्याने पोलिसांनी रस्त्यावर पडलेले सर्व टायर जमा केले. तसेच, पंक्चरच्या दुकानांसमोर ठेवलेले टायर जप्त करण्यात आले.

गहुंजे स्टेडियमवर विशेष लक्ष

सध्या आयसीसी वर्ल्ड कपसाठी क्रिकेटचे सामने सुरू आहेत. आयुक्तालयाच्या हद्दीतील गहुंजे येथील स्टेडियमवर यातील काही सामने होत आहेत. आज बुधवारी (दि. 1) न्यूझीलंड विरुद्ध साऊथ आफ्रिका असा क्रिकेटचा सामना नियोजित आहे. दरम्यान, काही मराठा आंदोलक स्टेडियमची खेळपट्टी उखडणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे स्टेडियम परिसरात पोलिसांकडून विशेष लक्ष देण्यात आले. मंगळवारी पोलिस आयुक्त चौबे यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकार्‍यांनी स्टेडियमवर जाऊन सुरक्षेच्यादृष्टीने पाहणी केली.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news